मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना पालकमंत्रिपदी नियुक्त्या मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या सुधारित यादीत पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून चंद्रकांत पाटील यांना हटवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली आहेत. चंद्रकांत पाटील हे आता सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना मागणीप्रमाणे कोल्हापूर, धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र, छगन भुजबळ नाशिक आणि महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे या रायगड जिल्ह्यासाठी आग्रही असल्या, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन जिल्ह्यांवरील दावा कायम ठेवल्याने भुजबळ आणि आदिती तटकरे यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यांना कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी दिली नसल्याने या दोन जिल्ह्यांचा तिढा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे 40 आमदार सामील झाले. त्यानंतर 2 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, तीन महिने झाले तरी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही मंत्र्याची पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली नव्हती. नाशिक, पुणे आणि रायगड जिल्ह्यांवरून वाद निर्माण झाल्याने पालकमंत्रिपदाचा पेच वाढला. मात्र, तीन महिने झाले तरी नियुक्त्या होत नसल्याने अजित पवार यांनी नाराजीअस्त्र उपसले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी गणपतीला जाणेही टाळले होते.
त्यांच्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी गेल्या शनिवारी 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे सरकारमध्ये सामील होऊनही आपल्या मनाप्रमाणे होत नसल्याने अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीलाच दांडी मारली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेदेखील त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. संध्याकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्र्यांची 11 मंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली.