मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरून तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. 35 ते 40 आमदारांसह अजित पवार हे भाजपसोबत जाणार, अमित शहांची भेट घेतली, जागावाटपही ठरल्याच्या बातमीने रविवारी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांचा बाजार गरम झाला. या चर्चांवर खुद्द अजित पवार यांनीच खुलासा करण्याची मागणी ठाकरे गट, काँग्रेसकडून करण्यात आली. तर शरद पवारांच्या मूक संमतीनेच ही फूट पडणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्यातच येत्या 15 दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असल्याचे विधान करत प्रकाश आंबेडकर यांनी भर घातली.
अजित पवारांसह काही आमदार नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या 8 एप्रिलला आल्या होत्या. त्यावर आजारी होतो, असा खुलासा अजित पवारांनी केला होता. मात्र 8 तारखेला अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारातून ही भेट घडली. खा. सुनील तटकरेही यावेळी उपस्थित होते. या भेटीत जागावाटपावरही शिक्कामोर्तब झाल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर अजित पवारांना भाजपबरोबर जात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 35 ते 40 आमदारांचा पाठिंबाही आहे. पण शरद पवार भाजपबरोबर जाण्यास इच्छुक नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
अजित पवार हे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटले की नाही, हे त्यांनाच विचारावे लागेल. तशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण मुळात भेटले का नाही, याचे कोणीतरी खात्रीलायक स्पष्टीकरण दिले पाहिजे. त्यामुळे या तर्कावर चर्चा करण्याची गरज नाही.
राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे ते भाजपबरोबर जातील. शरद पवारांची मूक संमती असल्यानेच राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील. त्यामुळे 'पक्ष' म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही, ही भूमिका म्हणजे बनाव आहे. सत्ता गेल्यामुळे आता उद्धव ठाकरे किंवा काँग्रेससोबत राहण्यात राष्ट्रवादीला रस वाटत नाही. ईडीची भीती राष्ट्रवादीतील अनिल देशमुख, जेलमध्ये असलेले नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांना नाही का? अजित पवारांनाच ईडीची भीती कशी वाटते? हे सगळं नाटक वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे, असे शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.