पुढारी ऑनलाईन डेस्क : NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या 25 वर्षात फोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. आता तर राष्ट्रवादी राज्याच्या पटलावरून नामशेष करण्याची चाल खेळली गेली आहे. शिवसेनेसोबत झाले ते राष्ट्रवादीसोबत सुरू आहे. पक्षाची चोरी करणा-यांचा सुळसुळाट सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी नाव न घेता भाजपवर केली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित शरद पवार गटाची बैठकीत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी बंड केल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. आज राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. यात कोणत्या गटासोबत किती आमदार आहेत, हे स्पष्ट झाले. दरम्यान, दोन्ही गटांनी पक्षचिन्ह आणि पक्ष नावासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे दोन्ही गटासाठी आता ही वर्चस्वाची लढाई ठरली आहे. अजित पवार गटाची बैठक वांद्रे येथील एमईटी कॉलेज तर शरद पवार गटाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडत जयंत पाटील पुढे म्हणाले, शरद पवार यांनी अनेकांना संधी दिली. विठ्ठलाच्या बाजूला बडवे आहेत असे छगन भुजबळ यांनी म्हटले. पण मला भुजबळांना विचारायचे आहे की, तुम्ही तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तुमच्या डोक्यावर फुले पगडी शरद पवारांनी ठेवली, तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? 2019 ला शरद पवार यांनी मंत्री मंडळात पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले, तेव्हा बडवे आडवे नाही आलेत का? ज्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला, त्यांच्याच मांडीला मांडीला लावून बसायला का गेलात? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित करत छगन भुजबळांना प्रत्युत्तर दिले.
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून आज बैठक बोलवण्यात आली होती. अजित पवार गटाचा वांद्रे येथील एमईटी मैदानावर मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, "बबन पाचपुतेंना जबाबदारी दिली. दादांनी त्यादिवशी कुणी किती दिवस काम केलं ते सांगितलं. आताचे जे आमचे प्रदेशाध्यक्ष ते साडेपाच वर्षांपासून आहेत. तीन वर्षांनी निवडणुका व्हायला पाहिजे. आम्ही सांगतोय सगळ्यांच्या निवडणुका घ्या. पण, प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक घ्यायची नाही. मग आमची निवडणूक कशाला घेता."तुम्ही हलणार नाही आणि बाकीच्यांना सांगता आहात की बदलायचं आहे, भाकऱ्या फिरवायच्या आहे. अरे पण मेन रोटला बसलेला आहे, तो फिरवायचा की नाही? त्यांना तरी समजायला पाहिजे. त्यामुळे हे हळूहळू हे झालं. काही वेळी काही गोष्टी होतात."
अजून खाते वाटप झालेले नाही. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जे 40 जण गेले त्यांची तक्रार महाविकास अघाडीतील 'राष्ट्रवादी' होती. आता तीच तक्रार पुन्हा नव्या सरकारमध्ये असेल का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच येणा-या काळात शिंदे गटातील आमदारांना उद्धव ठाकरेंकडे परत फिरायचे वेध लागतील, असेही भाकीत त्यांनी केले.