Latest

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय पेच? उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना, तर मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व बैठकाच केल्या रद्द

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले असून त्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटासंदर्भातील याचिकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने सातत्याने विरोधकांकडून टिका होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस आज पुन्हा दिल्लीला पोहचल्याची चर्चा आहे.

महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन.व्ही.रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज पुन्‍हा सुनावणी झाली. त्यानंतर दुपारच्या सुमारास फडणवीस हे त्यांच्या मुंबईतील 'सागर' बंगल्यावरुन विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. सायंकाळी दिल्लीमध्ये ते भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून 8 ऑगस्टपर्यंत शपथविधी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी आले. एवढेच नाही तर 15 ते 16 आमदारांची नावेही चर्चेत होती, जे मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे. आज अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती बिघडल्याने दिवसभराच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.

बैठका रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेशी जोडला जात आहे, मात्र एकनाथ शिंदे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी विश्रांती घेण्यासाठी बैठका रद्द केल्या आहेत. सततचे दौरे, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकांमुळे मुख्यमंत्र्यांना त्रास जाणवत आहे. अशा स्थितीत डॉक्टरांनी शिंदे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सातत्याने दिल्ली दौरे सुरू आहेत. याशिवाय महाराष्ट्र दौरा, उद्घाटन कार्यक्रम, सत्कार समारंभ आणि जाहीर सभांमध्ये ते व्यग्र आहेत. या सगळ्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर झाला आणि त्याला थकवा जाणवू लागला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यांनी आजचे सर्व कार्यक्रमही तातडीने रद्द केले. फडणवीस पक्षाश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. शिवसेनेच्या चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याच्या सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेल्या निर्देशामुळे भाजपने सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर सत्तेवर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, ५ ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी होणार असल्याचे बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी फक्त काही आमदारच मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यात भाजपचे सात आणि शिंदे गटाच्या सात आमदारांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह दिल्ली दौऱ्याला सुरुवात केली. मात्र महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT