पुढारी ऑनलाईन: आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी एक प्रश्न विचारला, जो "राज्य शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासंबंधी होता. ते पुढे म्हणाले की, जनगणनेचे काम बहुतेकवेळा शिक्षकांवर अतिरिक्त बोजा म्हणून लादले जाते. शिक्षकां ऐवजी या कामासाठी या बेरोजगार असणाऱ्याला शासन समाविष्ट करून घेणार का? या विषयी सरकार एखाद्या पॉलिसीचा विचार करणार आहे का?" डावखरे यांच्या या प्रश्नाचे उत्तर राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. उत्तर देताना त्यांनी मिस्कील भाषेत टिपण्णी केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
या संदर्भात वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देताना मंत्री मंगलप्रभात लोढा मिस्किलपणे म्हणाले, "सभापती महोदया, मंत्रिमंडळात एक तर मी नवीन प्लेयर आहे, त्यातही मला ओपनिंगलाच उभं केलं आहे आणि समोरून माझ्यावर बाऊन्सरवर बाऊन्सर टाकले जात आहेत. त्यांनी आता तरी थांबायला हवं, कारण त्या प्रश्नांचा याच्याशी काहीही संबंध नाही". कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या या उत्तराने सभागृहात जोरदार हशा पिकला. "मी तुमच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर उत्तर देईन. राज्यात दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या खाजगी आस्थापनांनी कौशल्य विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक आहे" असे उत्तरही लोढा यांनी दिले. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.