Latest

विधान परिषद निवडणूक : ‘समझोता एक्स्प्रेस’ला नागपूर, अकोल्यात ब्रेक

अमृता चौगुले

गेल्या काही महिन्यांतील टोकाच्या आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांची मुंबईतून सुरू झालेली राजकीय समझोता एक्स्प्रेस ( विधान परिषद निवडणूक ) कोल्हापूरमार्गे धुळ्यावरून पुढे गेली; पण वाशिम आणि नागपुरात मात्र या एक्स्प्रेसला ब्रेक लागला. त्यामुळे सहा जागांपैकी चार जागा बिनविरोध, तर नागपुरात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि वाशिममध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे.

विरोधकांकडून टार्गेट केले जाणारे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि त्याला प्रत्युत्तर देताना सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या तोफांना बत्त्या या पार्श्वभूमीवर राज्यात एका वेगळ्या सामोपचाराच्या राजकारणाची सुरुवात झाली. रजनी पाटील आणि डॉ. प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीसाठी भाजपने सहकार्याचा हात पुढे केल्यानंतर काँग्रेसनेही या हाताला आपल्या हाताची साथ दिली. म्हणूनच राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

टोकाचे आरोप-प्रत्यारोप ( विधान परिषद निवडणूक )

कोल्हापूर, धुळे-नंदूरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम, नागपूर या प्रत्येकी एक आणि मुंबईच्या दोन अशा सहा जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली. आरोप-प्रत्यारोपांना टोक आल्याने निवडणुका गाजणार याची चर्चा होती. फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला होता; तर स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांवर नजर ठेवणारी यंत्रणा कार्यरत होती. या निवडणुकीतील मतांची फुटाफूट लक्षात घेता नेत्यांनीही मतदारांच्या बैठका घेऊन 'फुटाल तर याद राखा,' असा सज्जड दमही भरला होता. त्यामुळे एकमेकांचा उभा दावा असल्यासारखे भांडणारे सत्ताधारी आणि विरोधक फोडाफोडीच्या राजकारणात गुंतले होते.

पाटील, सातव यांच्या बिनविरोध निवडीस भाजपचे सहकार्य ( विधान परिषद निवडणूक )

हे सगळे एका बाजूला घडत असतानाच राज्यात रजनी पाटील आणि डॉ. प्रज्ञा सातव यांच्या निवडी बिनविरोध करताना भाजपने सहकार्याचा हात पुढे केला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप नेत्यांना या जागा आमच्या आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी सहकार्य करा, अशी विनंती केली होती. आता भाजपला या सहकार्याचा प्रतिसाद मागण्याची संधी विधान परिषदेच्या निवडणुकीत आली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील बाजार रोखण्यासाठी नेतेच सरसावले ( विधान परिषद निवडणूक )

स्थानिक स्वराज्य संस्था संस्थांच्या निवडणुकीतील बाजार रोखण्यासाठी भाजपचे काही नेते कामाला लागले. त्यासाठी 'ज्याच्या जागा त्याच्याकडे ठेवायच्या,' असा समान धागा निश्चित करण्यात आला. यातूनच मग जो विद्यमान आमदार आहे, त्याच्या विरुद्ध ज्याने अर्ज भरला, त्याने मागे घ्यायचा, असे सूत्र ठरले. स्थानिक पातळीवर संमती झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाची याला परवानगी आवश्यक होती. भाजपची सारी सूत्रे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती, तर काँग्रेसची सूत्रे सोनिया गांधींकडे होती.

राजीव सातव या राज्यसभा खासदारांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी रजनी पाटील यांना संधी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजप नेत्यांशी संपर्क करून ही निवड बिनविरोध होण्यासाठी केलेली विनंती यशस्वी ठरली आणि रजनी पाटील राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्या.

काँग्रेस-भाजपच्या दिल्लीश्वरांचा बिनविरोधसाठी आशीर्वाद

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीच्या निमित्ताने पडद्यामागे ज्या घटना घडतात, त्या नेहमीच बातमीचे विषय ठरले आहेत. हा बेभरवशाचा खेळ थांबविण्याचा विचार राजकीय पक्षांच्या पातळीवर सुरू झाला आणि त्याला काँग्रेस आणि भाजपच्या दिल्लीश्वरांनी आशीर्वाद दिल्याने तो विनाअडथळा पार पडला हे विशेष!

मुंबईत विधान परिषदेच्या दोन जागा आहेत. येथून शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप असे दोन भाई प्रतिनिधित्व करीत होते. मात्र, नव्या राजकीय वातावरणात काँग्रेसकडे बहुमत नव्हते. त्यामुळे उमेदवार न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. शिवसेनेने रामदास कदम यांचा पत्ता कट करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीचा बालेकिल्ला सोडणार्‍या सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली, तर भाजपकडून इच्छुक असलेले माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना डावलत राजहंस सिंह यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली. सदस्य संख्येच्या बळावर शिवसेना आणि भाजपचा एक-एक उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट होते. तरीही काँग्रेस पुरस्कृत म्हणून सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांनी अर्ज माघार घेताच ही निवडणूक बिनविरोध झाली. 227 सदस्यांच्या मुंबई महापालिका सभागृहात शिवसेनेचे 97, तर भाजपचे 81 सदस्य आहेत.

धुळ्यातून अमरीश पटेल बिनविरोध

धुळ्यात भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची होती, तर अमरीश पटेल यांच्या विरोधात काँग्रेसने गौरव वाणी यांना उमेदवारी दिली होती. भाजपने अमरीश पटेल यांना निवडून आणण्याचे ठरवले होते. त्या बदल्यात त्यांनी कोल्हापूरचे उमेदवार अमल महाडिक यांना माघार घ्यायला लावली. त्याचा उल्लेख भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात केला.

अकोल्यात शिवसेना विरुद्ध भाजप

अकोला – बुलडाणा – वाशिम मतदारसंघातून शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया हे विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेथेही शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना होणार आहे.

कोल्हापुरात समझोता एक्स्प्रेस…

कोल्हापुरात चुरस होती आणि पारंपरिक राजकीय वादाची किनार होती. त्यामुळे सगळीकडे बिनविरोध निवडणूक झाली तरी कोल्हापुरात निवडणूक होणारच, असे अनेकजण छातीठोकपणे सांगत होते. सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाचा आहे. त्यामुळे अमल महाडिक यांची उमेदवारी जाहीर होताच चुरस ठरलेली होती; पण समझोता ऐक्याची एक्स्प्रेस कोल्हापूरच्या रेड सिग्नलवर न थांबता पुढे गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT