बारामती, पुढारी वृत्तसेवा: रत्नागिरीच्या बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर त्यांच्याशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढला पाहिजे, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, रिफायनरी प्रकल्पासंदर्भात मी ट्विट करत मत व्यक्त केले आहे. मानवतेच्या दृष्टीने संवेदनशीलपणे त्यातून मार्ग काढावा, चर्चा करावी. राज्याची निर्मिती झाल्यापासून अनेक वेगवेगळ्या प्रकल्पाच्या बाबतीत आंदोलने झाली, कधी लोकांचे सहकार्य मिळाले, कधी विरोध झाला. समृद्धी महामार्गालाही लोकांचा विरोध होता. परंतु चर्चा झाली. लोकांना चांगला मोबदला मिळाला. त्यामुळे मोठा प्रकल्प मार्गी लागू शकला. तशा प्रकारे या प्रकल्पाच्या बाबतीत वेगवेगळी मते आहेत. हा प्रकल्प व्हावा असे १०० टक्के म्हणणारे किंवा नको व्हायला असे म्हणणारा सगळाच वर्ग असेल असेही नाही. परंतु, विरोध करण्याची काय कारणे आहेत, त्यांचा विरोध पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून असेल, कोकणचे निसर्गसौंदर्य, वातावरण बिघडवणारा असेल, तर त्यात त्यांना समजून सांगितले पाहिजे. त्यातील तज्ज्ञ लोकांनी शंकेचे निरसन केले पाहिजे.
एन्रॉन प्रकल्प आणताना लोकांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर लोकांचा विरोध मावळला. त्यानंतर तो प्रकल्प मार्गी लागला. रिफायनरीच्या संदर्भात तेथील लोकांची मुस्कटदाबी होऊ नये, जे काही व्हायचे ते संमतीने व्हावे. त्यातून मार्ग काढला जावा, विकासकामांना आमचा कधीच विरोध नाही. प्रसिद्धीमाध्यमांना तिथे जाऊ दिले जात नाही, त्याबद्दल राज्यकर्त्यानी हस्तक्षेप करावा. तेथील पदाधिकारी, अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत चर्चेतून मार्ग काढावा. राष्ट्रवादीची भूमिका ही नेहमीच विकासाला पुरक अशी राहिली आहे. परंतु, विकास होत असताना त्या परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, तेथील निसर्गसौंदर्याला बाधा पोहोचणार नाही, समुद्रकिनारा, पर्यटनाला बाधा पोहोचणार नाही, याची खबरदारी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी.
पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात रोजी रोटीचा प्रश्न सुटतो आहे. व्यवसाय वाढत आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घ्यावी. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर मार्ग काढावा, तथ्य नसेल तर समजावून सांगण्याची भूमिका घ्यावी. जर त्यांना योग्य मोबदला पाहिजे असेल तर त्या बद्दलचा मार्ग काढावा. पर्यावरणाचा प्रश्न असेल तर पर्यावरणवाद्यांशी चर्चा करून पुढे जावे, असे पवार म्हणाले.