पुढारी ऑनलाईन डेस्क : फेअरप्ले ॲपवर आयपीएल २०२३ चे (IPL 2023) बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएल २०२३ चे स्ट्रीमिंग केल्याने IPL चे अधिकृत प्रसारण हक्क असलेल्या Viacom चे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी तमन्नाला २९ एप्रिल रोजी सायबर पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. (Fairplay IPL Streaming Case)
याच प्रकरणी अभिनेता संजय दत्त याला २३ एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते. पण तो चौकशीसाठी हजर झाला नव्हता. त्याऐवजी त्याने आपले म्हणणे नोंदवण्यासाठी तारीख आणि वेळ मागितली होती. आपण त्या तारखेला भारतात नव्हतो, असे त्याने कळवले आहे.
वायकॉमच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सायबर विभागाने फेअरप्ले ॲप विरोधात एफआयआर नोंदवले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना भाटियाने फेअरप्ले ॲपचे प्रमोशन केले होते. फेअरप्लेच्या प्रमोशनसाठी नेमका तिच्याकडे कोणी संपर्क केला होता आणि त्यासाठी तिला किती पैसे मिळाले होते, याची चौकशी आता सायबर पोलिस करणार आहेत.
वायकॉमने केलेल्या तक्रारीत दावा केला होता की फेअरप्लेने टाटा आयपीएल २०२३ चे बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्याने त्यांचे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच महादेव ऑनलाइन बुकची उपकंपनी असलेल्या फेअरप्लेच्या संदर्भात Viacom18 अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहे. महाराष्ट्र सायबर सेलने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीनेही जानेवारीमध्ये या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.
फेअरप्ले ॲप हे बेटिंग ॲप्लिकेशन आहे. हे Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उपलब्ध आहे. पण फेअरप्ले ॲप विरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर बादशाह, संजय दत्त, जॅकलिन फर्नांडिस आणि तमन्ना यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये या बेटिंग ॲपच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती.