पुढारी ऑनलाईन: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या खासगी बसच्या अपघाताबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देत जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज पहाटे खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ ही घटना घडली. या भीषण अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ही खासगी बस पुण्याहून मुंबईला निघाली होती, बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले आहेत.