पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडी ही महाविनाश आघाडी आहे. हे सरकार केवळ टीका, टोमणे, आरोप करण्यात व्यस्त असून राज्यकर्त्यांना जनतेशी देणे घेणे नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेतील भाषणाला प्रत्युत्तर देताना त्यांनी खोचक टोले लगावले. फडणवीस यांनी विं. दा. करंदीकर यांच्या एका कवितेचे वाचन करत राज्य सरकारला सभागृहात धारेवर धरले.
फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. सफाई कर्मचा-यालाही लुटण्याचे काम सुरू आहे. कोरोना काळात काढण्यात आलेल्या सर्व कंत्राटामध्ये घोटाळे झाले आहे. कुठल्याही टेंडरविना मुंबई पालिकेने कंत्राटे काढली. नालेसफाई, रस्ते चर भरण्यात, टॅब खरेदी यात घोटाळे झाले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केले.
मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंटचा आकडा ४५ वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे. कशाप्रकारे महापालिकेचं बजेट लुटून नेण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. यूएनने कौतुक केलं, कोर्टानं कौतुक केलं, पण हा भ्रष्टाचार, हे घोटाळे त्यांच्यासमोर जायला हवेत, असाही आरोप त्यांनी केला.
फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं भाषण चांगलं होतं. मात्र देण्याच्या नावाखाली तुम्ही घेताय. मुंबई महापालिकेचं बजेट शिवसेने लुटलं. सफाई कामगारांच्या नावावर तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरल्या. कोरोनाकाळात मुंबईतलं एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. मुंबई मेली तरी चालले असे प्रशासन वागत आहे. यावर आम्ही बोललो तर आम्हाला शत्रू म्हणतात. मराठी माणसाला दैवत बनून लुट सुरू आहे. मुंबईतल्या माणसाच्या लक्षात आलंय की प्रेताच्या टाळूवरचं लोणी कुणी खाल्लं आहे. हायवे नावाच्या कंपनीला एकच उरलीय समजून कंत्राट दिलं. ही हायवे कंपनी पेंग्विन आणतात, पिंजरे बांधतात. साधा यांच्याकडे जीएसटी नंबर नाही. हे डिपार्टमेंटल स्टोर्सचा नंबर वापरतात, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.