पुढारी ऑनलाईन डेस्क : आई आणि मुलाचा १२ तासांच्या आत दोन वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशच्या रेवा येथे घडली. आईचा रेवा जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला. तर आईच्या अंत्यविधीसाठी इंदुरहून निघालेला मुलगाही अपघातात ठार झाला आहे. राणी देवी (वय ५५) असे अपघातात मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. तर सुरज सिंग असे अंत्यविधीसाठी इंदुरहून निघालेल्या मुलाचे नाव आहे. दोघांवरही रेवा जिल्ह्यातील जत्री येथील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. (Madhya Pradesh )
याबाबत अधिकची माहिती अशी की, राणी देवी बुधवारी (दि.९) मुलगा सनी याच्यासोबत माहेरी जात होत्या. दरम्यान, १२ किलोमीटर दूर असलेल्या डुभौरा येथे त्यांना दुचाकीने धडक दिली. या वेळी जखमी राणी देवी यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना रेवा येथे हलवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, रेवा येथे उपचारासाठी जात असताना त्यांचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूची बातमी समजताच सूरज इंदुरहून आपल्या गावी मित्राच्या गाडीतून रवाना झाला. गावापासून सुमारे १०० किमी अंतरावर असताना सूरजच्या कारचा रामपूर येथे अपघात झाला. दरम्यान आई आणि मुलाचा १२ तासांच्या आत अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (Madhya Pradesh )
राणी देवी यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे तीन मुला-मुलींचा संभाळ राणी देवी यांनीच केला होता. त्या प्रकाश आणि सनी या दोन मुलांसह जत्री या आपल्या मुळगावी राहत होत्या. तर सूरज हा मुळगावापासून ८३० किलोमीटर दूर इंदुर येथे राहत होता. (Madhya Pradesh)