Latest

CSKvsLSG : लखनौचा रोमांचकारी विजय, चेन्नईला लागोपाठ दुसर्‍यांदा पराभवाचा तडाखा

Shambhuraj Pachindre

मुंबई : वृत्तसंस्था

एविन लुईस नावाच्या तुफानापुढे गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जला सपशेल शरणागती पत्करावी लागली आणि लखनौ सुपर जायंटस्ने एका महाकठीण विजयाची नोंद केली. या स्पर्धेतील त्यांचा हा पहिलाच विजय. गतविजेत्या चेन्नईला लागोपाठ दुसर्‍यांदा पराभवाचा तडाखा सहन करावा लागला. विजयासाठी चेन्नईने लखनौपुढे 211 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते.

सामन्याचे पारडे ठराविक अंतराने दोन्ही बाजूला झुकत होते. अखेर तीन चेंडू बाकी असतानाच लखनौने थरारक विजय संपादला आणि कर्णधार के. एल. राहुल याच्यासह त्याच्या सहकार्‍यांनी आनंदोत्सव साजरा केला. क्विंटन डी कॉक (61), के. एल. राहुल (40) यांनी संघाची उत्तम पायाभरणी केली. त्यावर कळस चढवला तो लुईसने. 23 चेंडूंत त्याने नाबाद 55 धावा कुटल्या.

सहा चौकार व तीन गगनचुंबी षटकार खेचून त्याने चेन्नईच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला. या सामन्यातील एकोणीसाव्या षटकात तुफानी आतषबाजी करून लुईसने सामना लखनौच्या बाजूने फिरवला. क्रिकेटला थरारक अनिश्चिततेचा खेळ का म्हणतात हे लखनौ संघाने सप्रमाण सिद्ध करून दाखवले. त्यांच्या नावापुढे आता विजयाचे दोन गुण लागले आहेत. तथापि, चेन्नईची पाटी कोरीच आहे.

त्यापूर्वी चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 210 धावांचा डोंगर उभारला.पण तोसुद्धा अपुराच ठरला. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी स्फोटक खेळ्या केल्या. त्या अर्थातच निष्फळ ठरल्या. उथप्पाने धमाकेदार खेळी करताना अर्धशतक ठोकले. अवघ्या 27 चेंडूंचा सामना करताना त्याने 8 चौकार व एक उत्तुंग षटकार खेचला.

दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाड या सामन्यातही दुर्दैवी ठरला. रवी बिश्नोई याने केलेल्या अचूक फेकीमुळे तो धावबाद झाला. मोईन अली याने 35 धावांची झटपट खेळी केली. शिवम दुबेने 49 धावा चोपल्या. महेंद्रसिंग धोनी याने फक्त सहा चेंडूंत 16 धावा वसूल केल्या. दोन चौकार व एक षटकार हे त्याचे मुख्य फटके. वयाच्या चाळीशीत त्याने दाखवलेली तंदुरुस्ती अफलातूनच म्हटली पाहिजे. कर्णधार रवींद्र जडेजाने तीन चौकारांसह 17 धावांची छान खेळी केली.

संक्षिप्त धावफलक :

चेन्नई : 20 षटकांत 7 बाद 210
लखनौ : 19.3 षटकांत 4 बाद 21

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT