नगर तालुका, पुढारी वृत्तसेवा: नगर-औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनचे काम मनमानी पद्धतीने सुरू आहे. त्यांच्या नियोजन शून्य कामामुळे जेऊर परिसरातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या नुकसानीचा मोबदला तसेच गॅस पाईपलाईनच्या कामातील हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, अन्यथा समस्त ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी दिला आहे.
गॅस पाईपलाईनचे काम सुरू करताना त्यांना परवानगी देताना कोणते नियम, अटी लागू करण्यात आल्या. वृक्ष, फळझाडांची तोड करताना तसेच वाहतुकीसाठी परवानगी देताना काही निकष लावण्यात आले की नाही, विद्युत महामंडळाचे पोल शिफ्ट करण्यात आले. काम करताना लहान मोठ्या पुलांचे नुकसान झालेले आहे. संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने कधीही एकेरी वाहतूक करतात. त्यामुळे अपघात घडलेले आहेत. अपघातात निष्पापांचे बळी गेले तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल बेल्हेकर यांनी केला आहे.
काम सुरू असताना काम करणारी वाहने तसेच उकरलेली माती रस्त्याच्या मधोमध टाकण्यात येत आहे. पावसामुळे चिखल होऊन दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. अपघात झाल्यानंतर देखील काम करणार्यांना काही देणेघेणे नसल्यासारखे वागत आहेत. परिसरातील व्यावसायिकांसमोर चर खोदून कित्येक दिवस आहे त्याच अवस्थेत ठेवला जात आहे. चर खोदण्यासाठी संबंधित ठेकेदार व्यावसायिक यांच्याशी गोड बोलतात, अन् काम झाले की तेथील नुकसानीचा विचार करत नाहीत. चर बुजवल्यानंतर तेथे संपूर्ण चिखल होत असून व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
गॅस पाईपलाईनच्या कामासाठी अनेक लहान-मोठे पुल तोडण्यात आले आहेत. परिसरात जोरदार पाऊस होत आहे. पाणी जायला जागा नसल्याने अनेक शेतकर्यांचे बांध फुटून सुपीक माती वाहून गेली आहे. संबंधित ठेकेदाराकडून अरेरावेची भाषा करण्यात येते. गॅस पाईपलाईन साठी परवानगी देणार्या वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत महावितरण कंपनी व इतर विभागाच्या अधिकार्यांची देखील चौकशी करण्याची गरज असल्याचे बेल्हेकर यांनी सांगितले.
शेतकर्यांना एक पोल शिफ्ट करण्यासाठी अनेक हेलपाटे मारायला लावणारे अधिकारी गॅस पाईपलाईन बाबत एवढे तत्पर कसे झाले. तीच परिस्थिती इतर विभागांची देखील आहे. सर्वच खाते गॅस पाईपलाईन कंपनीवर मेहेरबान कसे? यामागचे गौडबंगाल काय हे शेतकर्यांना देखील समजणे गरजेचे आहे. शेतकरी, व्यावसायिक, अपघातग्रस्त यांचे झालेले नुकसान कोणताही अधिकारी अथवा पदाधिकार्याला दिसत नाही हे विशेष.
गॅस पाईपलाईन मुळे झालेल्या शेतकरी, व्यावसायिक व अपघातग्रस्तांना तात्काळ पंचनामे करून मदत मिळणे गरजेचे आहे. तसेच अपघातात बळी गेल्यामुळे संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा जेऊर परिसरात सुरू असलेले काम बंद पाडून आंदोलनाचा इशारा बेल्हेकर यांनी दिला.
संबंधित गॅस पाईपलाईनचे काम नियोजन शून्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकरी, व्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कंपनीला परवानगी देणार्या सर्व विभागाच्या अधिकार्यांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी लक्ष घालण्याची गरज आहे, असे दिनेश बेल्हेकर म्हणाले.
शेतकरी, व्यावसायिक यांचे नुकसान झाले असले तरी त्यांच्यात एकी नाही. पर्यायाने संबंधित ठेकेदाराशी वैयक्तिक रित्या शेतकरी, व्यावसायिक वाद घालताना दिसतात. पण त्यांचे काही एक चालत नाही ही परिस्थिती आहे. तरी आम्हाला न्याय मिळणार का ? अशी आर्त हाक शेतकरी वर्गामधून व्यक्त होत आहे.