पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी त्यांनी काल (दि.१२) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (LokSabha Election 2024)
माढा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धैर्यशील मोहिते-पाटील प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्याला थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच गुरुवारी उत्तर दिले. येत्या दोन दिवसांत धैर्यशील मोहिते-पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. (LokSabha Election 2024)
पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, मोहिते-पाटील दोन दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. मात्र, कोणती अपेक्षा ठेवून ते पक्षात येत नसल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, धैर्यशील मोहिते- पाटील यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावर मोहिते-पाटील यांनी प्रतिक्रिया देताना वेट अँड वॉच अशी भूमिका स्पष्ट केली होती. मोहिते-पाटील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. (LokSabha Election 2024)
माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नये यासाठी अकलूजचे मोहिते-पाटील आणि फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, भाजप श्रेष्ठींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा मोठा आग्रह कार्यकर्ते भाजपमध्ये असलेल्या मोहिते-पाटील यांना करत होते. या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची घेतलेली भेट ही महत्त्वपूर्ण ठरली.