Latest

Lokshabha Elections 2024 : डेटिंग अॅपवरून नवमतदारांना आयोगाची साद

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी सहभाग नोंदवावा आणि मतदानाचा हक्क बजावावा यासाठीच्या जागृतीसाठी निवडणूक आयोगाने विविध सोशल मीडिया अॅपचा वापर सुरू केला आहे. सोशल मीडियासोबतच आता डेटिंग अॅपच्या माध्यमातूनही मतदान जागृती मोहीम राबविण्याची शक्कल आयोगाने लढविली आहे. 'एव्हरी सिंगल व्होट काऊंट', व्होटिंग पार्टनर नीडेड' अशा खास डेटिंगच्या भाषेतील वाक्यांचे प्रचार सुरू करत आयोगाने ही मोहीम हाती घेतली आहे.
निवडणूक आयोगाने टिंडरवर एव्हरी सिंगल व्होट काऊंट्स अशी मोहीम सुरू केली आहे. यातून देशातील दोन कोटी युवा मतदारांना आकर्षित करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. अलीकडेच निवडणूक आयोगाने फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया साईट्सवर मतदान जागृती मोहीम सुरू केली. या साईट्सवर निवडणुकीची माहिती देणारे विशेष मेसेज प्रत्येक प्रोफाईलवर दिले जात आहेत. त्यानंतर आता आयोगाने शहरातील तरुणाईवर लक्ष केंद्रित केले आहे. 'टर्निंग१८' या मोहिमेच्या माध्यमातून त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्यासोबतच 'टू आर दी वन' हे अभियानही सुरू करण्यात आले आहे. आयोग सध्या सोशल मीडियावर अधिक सक्रिय असून व्हॉटसअॅप, लिंक्डीनसारख्या मंचाचाही वापर केला जात आहे.
गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा जोडीदाराच्या शोधातील व्यक्तींमध्ये टिंडर हे डेटिंग अॅप लोकप्रिय आहे. याचाच वापर करत मतदान जागृतीची मोहीम आखण्यात आली आहे. टिंडर वापरकर्त्याच्या प्रोफाईलवर 'व्होटिंग पार्टनर निडेड', 'फर्स्ट-टाईम व्होटर' आणि 'आय व्होट' असे स्टिकर्स दिसतील. त्यातून नव्या मतदारांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे.
टिंडरचे निम्म्याहून अधिक वापरकर्ते हे १८ ते २५ वर्षे वयोगटातील असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या माध्यमातून नवमतदारांना प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे शक्य असल्याचा निवडणूक आयोगाचा कयास आहे. त्यामुळे आयोगाने हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्र, मैत्रीण किंवा जोडीदाराच्या सोबत मतदान करण्याची ही आयडिया चालते का, हे लवकरच समोर येणार आहे. आयोगाला मात्र यातून मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT