Latest

lok Sabha Election : बारामतीत रंगणार पवार विरूद्ध पवार असा सामना

Arun Patil

राष्ट्रवादीकडे सध्या असलेल्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभा करण्याची घोषणा अजित पवार यांनी केल्याने आता बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना रंगणार असे चित्र निर्माण झाले आहे. आजवर बारामतीत शरद पवारांना आव्हान देणारे नेते हे पवार कुटुंबाच्या बाहेरचे होते. आता पहिल्यांदाच पवारांना घरूनच कडवे आव्हान मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. (lok Sabha Election)

बारामतीत केवळ पवार कुटुंबातील तगडे नेतृत्वच पवारांची सद्दी संपवू शकते, असे भाजपला वाटते. त्यामुळे सुरुवातीला अजित पवारांनी पार्थ पवारांच्या नावाचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी विचार केला होता. मात्र, त्यांच्या नावाला भाजपकडून विरोध करण्यात आला. पार्थ हे सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज देऊ शकणार नाहीत. त्याऐवजी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपने अजित पवारांवर दबाव वाढविला आहे. परिणामी, 'सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे' असा पवार कुटुंबातच चुरशीचा राजकीय सामना रंगणार आहे. (lok Sabha Election)

शिंदे गटाकडील जागाही पवारांना हव्यात

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेले शिंदे गटाकडील मतदार संघ आम्हाला मिळण्याबाबत भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांकडे चर्चा केली जाईल, अशी घोषणाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यावेळी केली. अर्थात, यावेळी त्यांनी जागांची नावे घोषित केलेली नाही. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुका महायुतीतील तिन्ही पक्ष एकजुटीने लढणार आहे. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत देखील राज्यातून नरेंद्र मोदी यांना 45 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा जिंकून देणार आहोत, असे शिंदे म्हणाले.

कुणाचेही आरक्षण हिरावून मराठा समाजाला आरक्षण नाही – पवार

मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावून घेतले जाणार नाही. तसेच राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे आले तरी भारतीय संविधानाने मागासवर्गीयांना दिलेल्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकणार नाही. मात्र, कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे, हे जाणून घेण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पदाधिकार्‍यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, आता आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे विविध सेलच्या प्रमुखांनी महिनाभरात जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यकर्त्यांना पदे वाटप करावीत, अन्यथा विद्यमान पदाधिकार्‍यांची पदे काढून दुसर्‍याला दिली जातील. अनेक प्रमुख पदाधिकारी मुंबईतील पक्षाच्या मुख्यालयात येतात. यापुढे त्यांनी स्थानिक कार्यालयात बसून लोकांचे प्रश्न सोडावावेत. तसेच कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी.

या माध्यमातून लोकांच्या मनातील आपल्याबाबतीत विश्वास दृढ करा, असे आवाहनही त्यांनी केले. यापुढे मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यानंतर जिल्हाध्यक्षांना पक्षात महत्व दिले जाईल, असेही जाहीर करताच पदाधिकार्‍यांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. शरद पवार यांच्यापासून फारकत का घ्यावी लागली, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. आपण पदाधिकारी नसतानाही पक्षाचे जोमाने काम केले आहे. राज्यातील जनतेला हे काही माहित आहे. त्यामुळे आता कोणी काहीही बोलत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष आपलाच आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेते पद काढून घेऊन मला पक्षाचा पदाधिकारी करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT