Lok Sabha Election 2024

ओडिशात भाजपचा स्वबळाचा नारा

दिनेश चोरगे

भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल (बीजेडी) या दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांसाठी ओडिशा हे राज्य गेल्या दशकभरापासून रणांगण बनले आहे. हे दोन पक्ष अनेकदा राजकीय लढाईत आमने-सामने आले. तथापि, त्यांनी 2019 मध्ये समझोता केला होता. यावेळी त्यांच्यातील संभाव्य युती तुटली असल्यामुळे भाजपने 'एकला चलो रे' अशी भूमिका घेतली आहे. परिणामी ओडिशातील राजकारण कूस बदलत असल्याचे जाणवू लागले आहे.

ओडिशात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि बीजेडी या दोन्ही पक्षांनी जागावाटप सुरळीतपणे पार पाडले होते. त्यामुळे कटू प्रसंग आला नाही. यावेळी चित्र पालटले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून बीजेडीला कडाडून विरोध केलेल्या भाजपने बीजेडीशी कसलाही समझोता न करता ओडिशातील सर्व 21 लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. दुसरीकडे, बीजेडीचे नेते आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना मुख्यमंत्रिपदाची आणखी एक टर्म निश्चित करायची आहे. मात्र, भाजपने यावेळी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे या राज्यात बीजेडी, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

भाजपच्या प्रदेश शाखेने सुरुवातीपासून बीजेडीसोबत युतीला जाहीरपणे विरोध दर्शविला होता. तथापि, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने राजकीय फायद्यासाठी मतभेद बाजूला ठेवण्यास तयार असल्याचे संकेत सुरुवातीला दिले होते. मतदारांच्या नजरेत आपापली प्रतिमा जपण्यासाठी दोन्ही पक्षांनी केलेली धोरणात्मक खेळी म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात होते. आता हे सारे चित्र पूर्णतः बदलले आहे. राजकारणात कोणी कितीही युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या, तरी निवडणुका जिंकणे हेच कोणत्याही राजकीय पक्षाचे अंतिम ध्येय असते. त्यामुळे गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हे दोन्ही पक्ष पूर्वीच्या वैमनस्याकडे दुर्लक्ष करून एकत्र आले होते. आता युती तुटल्यानंतर भाजपने ओडिशाचे मैदान मारण्यासाठी आपण सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपला सर्वोत्तम संधी

नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडी गेल्या 20 वर्षांपासून ओडिशात सत्तेत आहे. आता त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. सध्या त्यांचे वय 77 आहे. राज्यावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी सुरळीत राजकीय संक्रमण सुनिश्चित करण्याचे आव्हान बीजेडीसमोर आहे. दुसरीकडे, भाजपला ओडिशात सत्ता मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी असल्याचे दिसून येते. भाजप गेल्या अनेक वर्षांपासून राज्यावर स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी संघर्ष करत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनाईक यांचे वडील बिजू पटनाईक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि राज्य सरकारवर कोणताही हल्लाबोल करणे खुबीने टाळले. तेव्हापासून भाजपने ओडिशात आक्रमकपणे प्रचार सुरू केला आहे. भाजपने रणनीतीत केलेला हा बदल हे बदलत्या राजकारणाचे संकेत म्हटले पाहिजेत. भाजप आणि बीजेडी यांच्यातील संभाव्य युती तुटल्यामुळे आता हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत.

काँग्रेसच्या आशा दुणावल्या

ओडिशात वर्षानुवर्षे क्षीण होत चाललेल्या काँग्रेसच्या आशा यामुळे दुणावल्या आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला या राज्यात केवळ एक जागा जिंकता आली. अन्य जागांवर त्यांना दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी काँग्रेस कमबॅकची अपेक्षा बाळगून आहे. मात्र, प्रादेशिक पातळीवर काँग्रेसकडे भक्कम नेतृत्व नाही. त्या पक्षासाठी हा कच्चा दुवा ठरू शकतो. दुसरीकडे, बीजेडी आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांनी आपापल्या वॉर रूम सज्ज ठेवल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर ओडिशातील आगामी निवडणुका उत्कंठावर्धक असतील. प्रत्येक मतदारसंघात तिरंगी लढाई होणार असल्यामुळे हे 'कलिंग वॉर' उत्तरोत्तर रंगतदार होत जाईल, हे खरेच.

SCROLL FOR NEXT