Lok Sabha Election 2024

आदित्यची मुख्यमंत्री होण्याची लायकी आहे का?, बावनकुळे यांचा सवाल

अविनाश सुतार


नागपूर, पुढारी वृत्तसेवा: आदित्यला मुख्यमंत्री काय मंत्रीही केले नसते, त्यांची लायकी आहे का ?, कधी त्याने काम केले का ? कधी कुणाचे आधार कार्ड, रेशन कार्ड काढले का ?, एका सुरक्षित मतदारसंघात हवेत निवडून आले. एखादा अपघाती आमदार होऊ शकतो . पण मुख्यमंत्रीपदाची लायकी आहे का ? जेव्हा विकासावर बोलता येत नाही. समजावून सांगता येत नाही, तेव्हा गोंधळ निर्माण करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.२१) माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
उद्धव ठाकरेंना पुत्र प्रेम आहे.त्यांना आदित्यला मुख्यमंत्री करायचे आहे. आपली इच्छा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी ते टाकू पाहत आहेत. त्यांना माहिती आहे. माझ्या घरातला तर कोणी आयुष्यभर मंत्री होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्रीपद घेतले. स्वतःच्या मुलाला मंत्री केले. एका कार्यकर्त्याला मोठे करता आले असते. मात्र, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यावर मुलाला मंत्री केले.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास बघितला तर पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव पहिले समोर येईल. उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागतात. मोदींचे महाराष्ट्रात सुनामी वादळ आहे. महाविकास आघाडी हरण्याच्या मूडमध्ये गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस हे संताजीसारखे दिसत आहेत, असे बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे हे काहीही बोलायला शिल्लक नसल्यामुळे काहीतरी युक्ती शोधून काढतात. कधी अमित शहांवर कधी देवेंद्रजी तर कधी मोदींवर टीका करण्याचा धंदा सुरू आहे.
महाराष्ट्रात त्यांची सभा घ्यायला कोणी तयार नाही. लोकप्रियता अत्यंत ढासळलेली आहे. काहीतरी टीव्ही वर न्यूज चालवावी. त्यामुळे ते असे वक्तव्य अधूनमधून करतात. आता लोक कंटाळले आहेत. लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आहे. शेतकरी शेतमजुरांना विकसित भारत हवा आहे. लोकांचा कल त्याकडे आहे. त्यामुळे जनतेला कन्फ्युज करून मते घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.
लोकसभेनंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, असे वक्तव्य अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले की, काही गोष्टी प्रचारामध्ये बोलाव्या लागतात. त्यामुळे तशा प्रकारची वक्तव्य ते करत आहेत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असणार आहेत. या सगळ्या अफवा आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

SCROLL FOR NEXT