Lok Sabha Election 2024

हद्द झाली राव..! प्रचारासाठी थेट कंडोम पाकिटांचा वापर, आंध्रातील ‘प्रचार’ सोशल मीडियावर व्‍हायरल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : निवडणूक प्रचार आणि कंडोम यांचा काय संबंध, असा प्रश्‍न तुम्‍हाला पडला असेल. मात्र आंध्र प्रदेशमधील निवडणूक प्रचार मोहिमेत याचा संबंध आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष तेलगु देसम पार्टी त्‍यांच्‍या पक्षाचे चिन्‍ह छापलेले कंडोम पॅकेट जनतेला वितरित करत असल्‍याचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. यासंदर्भातील वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.

आंध्र प्रदेशमधील निवडणूक प्रचाराचा एक व्‍हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. यामध्ये सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आपल्‍या निवडणूक चिन्हांनी चिन्हांकित कंडोम पॅक दाखवले आहेत, जे कथितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे मतदारांना वाटले जात आहेत.

कथित टीडीपी कार्यकर्त्याला एक जण कंडोम का वितरित केले जात आहे, असा सवाल करतो. यावर तेथे बरीच मुले असतील तर जास्त पैसे वितरित करावे लागतील, म्हणूनच हे कंडोम वितरित केले जात आहेत, असे उत्तर या  व्‍हिडिओमधून मिळते.

सोशल मीडियावर आरोप-प्रत्‍यारोप

"आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी लोकांना कंडोमचे वाटप करणे. हा प्रसिद्धीसाठीचा वेडेपणा आहे? ते पुढे व्हायग्रा देण्यासही सुरुवात करतील का? निदान तिथेच थांबतील. नाहीतर ही घसरण आणखीनच वाढेल," असे जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने आपल्‍या अधिकृत X ( पूर्वीचे ट्विटर) हँडलवरील पोस्‍टमध्‍ये म्हटले आहे. तर तेलगु देसम पार्टीनेही वायएसआर काँग्रेस पक्षाच्‍या लोगोसह एक समान कंडोम पॅक पोस्ट केला आहे. हीच का तुमची निवडणूक तयारी, असा सवाल केला आहे.

SCROLL FOR NEXT