शिरूर लोकसभा मतदार संघातून महायुतीतर्फे अखेर माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. आढळरावांना शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार) घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. शिरूरमध्ये आता यामुळे विद्यमान खासदार महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात सामना रंगणार आहे.
आढळराव-पाटील हे तीनवेळा या मतदार संघाचे खासदार झालेले आहेत. गेल्या वेळी त्यांचा अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता.
2004 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर जुन्या खेड लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा शिवाजीराव आढळराव-पाटील लोकसभेवर निवडून गेले, त्यानंतर मतदारसंघाची रचना बदलल्यावर नव्याने झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून ते 2009 आणि 2014 मध्ये पुन्हा लोकसभेवर निवडून गेले. 2019 च्या लढतीमध्ये मात्र अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
पराभवानंतर दुसर्याच दिवसापासून आढळराव-पाटील यांनी आपण खासदार असल्यागत मतदार संघांमध्ये संपर्क दौरा सुरू केला तो आजपर्यंत कायम आहे. या मतदार संघात आढळराव-पाटील यांचा वाड्यावस्त्यांवर संपर्क आहे. अनेकांच्या सुख-दुःखाच्या क्षणी आढळराव-पाटील हे हजर असतात, अशी त्यांची मतदार संघांमध्ये ख्याती आहे. मतदार संघातील अनेक विकासकामे त्यांनी राज्यात असलेल्या सरकारच्या माध्यमातून करून घेतली आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आतापर्यंत त्यांनी चारशे-साडेचारशे कोटी रुपयांचा निधी आणला आहे.
विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी खासदार झाल्यानंतर मतदार संघांमध्ये बिलकुल संपर्क ठेवला नाही, अशी त्यांच्याबद्दल सर्वदूर तक्रार आहे. ते चांगले अभिनेते असल्यामुळे आपले चित्रपट, मालिका यांच्यामध्येच ते मग्न होते; परंतु लोकसभेत मतदार संघाचे प्रश्न मांडण्यामध्ये त्यांची कामगिरी चमकदार आहे, त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. उत्तम वक्तृत्व, माळी समाजाचा 'बुस्टर', अभिनेता म्हणून जनतेवर असलेली मोहिनी ही अमोल कोल्हे यांची जमेची बाजू आहे. अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांना धोका दिला, अशी भावना मतदारसंघात सर्वदूर आहे. या भावनेतून निर्माण होणार्या सहानुभूतीचा फायदाही कोल्हे यांना मिळू शकतो.
आढळरावांकडे महायुतीचे प्रचंड पाठबळ आहे. लोकसभा मतदार संघाच्या सहा विधानसभा मतदार संघांपैकी पाच महायुतीचे आमदार आहेत, त्यात जुन्नर (अतुल बेनके) खेड (दिलीप मोहिते-पाटील) आंबेगाव (मंत्री दिलीप वळसे-पाटील) हडपसर (चेतन तुपे) या मतदार संघात राष्ट्रवादीचे, तर भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे हे आमदार असल्यामुळे आणि आगामी विधानसभेसाठी सर्वांनाच पक्षाच्या उमेदवारीची फार गरज असल्यामुळे ही यंत्रणा मोठ्या प्रमाणावर आढळराव यांच्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे या मतदार संघांमध्ये आढळरावांना थोडीशी आघाडी आताच मिळालेली आहे. गेल्या चारही निवडणुकांत आढळरावांच्या विरोधातील उमेदवाराचे सर्व नियोजन सांभाळणारे मंत्री दिलीप वळसे-पाटील या वेळी प्रथमच आढळराव यांच्या बाजूला असणार आहेत. कोल्हे यांच्याकडे शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार अशोक पवार हे एकमेव आमदार आहेत, त्याचबरोबर प्रस्थापित नेत्यांकडून अन्याय झाल्याची भावना असलेल्या दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांवर कोल्हे यांची मदार असेल.
आदिवासी डोंगरी भाग, पठारावरील बागायती तसेच जिरायती परिसर, चाकण, भोसरी, रांजणगाव यांसारखा औद्योगिक आणि हडपसरसारखा कमालीचे नागरीकरण झालेला शहरी भाग अशी वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना असलेला भाग हे या मतदार संघाचे वैशिष्ट्य आहे. यामुळे या मतदार संघात निरनिराळे अनेक प्रश्न आहेत, त्यातला प्रमुख प्रश्न म्हणजे पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी याच प्रश्नाचा गाजावाजा करत गेल्यावेळी कोल्हे यांनी भरपूर आघाडी मारली होती; परंतु त्यांच्या काळात हे प्रश्न काही सुटले नाहीत. या दोन्ही महामार्गांवर पुणे शहरातून बाहेर पडताना दोन-दोन तास लागतात, यामध्ये या महामार्गांवर पुण्यापासून पुढे दुमजली रस्ता करण्याची घोषणा झाली; परंतु नाशिक महामार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम सुरू करण्याएवढीच त्यात प्रगती झाली. सोलापूर महामार्गावर तर तेवढेही झाले नाही.