सांगली : सुरेश गुदले
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात निकराच्या संघर्षाची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या खलबतात काँग्रेसतर्फे विशाल पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. यथावकाश त्यांची घोषणा होईल. मात्र काँग्रेस नेत्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. 1952 पासूनच्या निवडणुका पाहिल्या तर सांगलीत 17 वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. 2014 मध्ये मोदी लाटेमध्ये तसेच जयंत पाटील यांच्या मदतीमुळे भाजपचे संजय पाटील खासदार झाले. 2019 मध्येही तेच खासदार झाले.
आता सर्व काँग्रेसजनांनी एकजूट केलेली आहे. तशी त्यांची भाषा आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व दिलेले आहे. लोकसभेतील पराभवाची दहा वर्षे काँग्रेसने अनुभवली आहेत. आता काँग्रेस एकजुटीने लढली तरच चित्र बदलण्याची शक्यता आहे. खासदार संजय पाटील दहा वर्षे खासदार आहेत. दहा वर्षांच्या कालावधीमुळे नैसर्गिक नाराजी पसरलेली असते. ते निष्क्रिय असल्याची टीका त्यांच्याच पक्षातून कुजबूज ब्रिगेड करत असते. त्यांना पक्षांतर्गत विरोध मोठा आहे. याची त्यांनाही जाणीव आहे. त्यांनी प्रत्येक तालुक्यात 'संजय पाटील गट' तयार केलेला आहे. सरकार नामक अमाप यंत्रणा त्यांच्या मागे आहे. आर्थिक ताकद मोठी आहे. विलासराव जगताप म्हणतात, संजय पाटील विरोधकांची मोट बांधणार, ते तशी बांधतात का याचे उत्तर येणार्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
विशाल पाटील यांच्या पाठीमागे 'दादा घराणे' ही शक्ती आहे. या शक्तीचा विस्तार आणि वाढ करण्यात विशाल आणि प्रतीक पाटील कमी पडले. एक साखर कारखाना ते धड चालवू शकले नाहीत. स्थानिक संस्थांमध्ये सत्ता मिळू शकले नाहीत. निवडणुकीला चित्रांमध्ये येण्याऐवजी निवडणूक रोज आहे, असे समजून राजकीय चित्रांमध्ये कायम राहावयाचे असते. हे यांना कोण सांगणार? केवळ 'खेळ पैठणीचा' करून सर्व काही साध्य करता येणार नाही. ते म्हणतात, माझ्या राजकीय गाडीचे चालक आमदार डॉ. विश्वजित कदम आहेत. ते विशाल यांना म्हणजेच काँग्रेसला मनापासून मदत करतील, अशी आशा करूया. आशा म्हणण्याचे कारण असे की, कदम घराणे आणि दादा घराण्यातील भूतकाळातील राजकीय प्रेम. आमदार विश्वजित हे माजी आमदार, भाजप नेते विलासराव जगताप यांचे विधान खोटे ठरवतील, अशी अपेक्षा. विलासराव जगताप म्हणतात, जयंतराव आणि विश्वजित कोणालाही मोठे होऊच देत नाहीत. बदलत्या राजकारणाची धमनी ओळखून त्यांनी पक्ष वाढवला पाहिजे, असे काँग्रेसमधील तरुण फळीला वाटते.
या लढतीतील महत्त्वाचा मुद्दा जयंत पाटील यांच्या आघाडी धर्माचा आहे. त्याबाबत नेहमीच संशयाचे धुके राहिले आहे. सांगलीतील बीजेपी ओळख त्यांच्यामुळेच जेजेपी (जयंत जनता पार्टी) झाली आहे. मात्र खुद्द संजय पाटील यांनीच 'नो जेजेपी, आता ओन्ली बीजेपी' असे जाहीर केले आहे. राज्यातील बदलत्या समीकरणात जयंत पाटील आता महाआघाडीचे महत्त्वाचे नेते आहे. त्यांनी पोसलेला बीजेपी आता त्यांनाच गिळंकृत करायला उठला आहे. अशा काळात आता ते पुन्हा त्यांचा दोस्ताना जपून 'करेक्ट कार्यक्रमा'ची परंपरा पुढे सुरू ठेवणार का, यावर या लढतीची बरीच गणिते आहेत. अशा गमजा करणारे त्यांचे अनेक शिलेदार आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत. या सार्या संदर्भाचा विचार करता पूर्वीच्या पारंपरिक समीकरणातून आता सांगलतील लढतीकडे पाहता येणार नाही.
तिसरा मुद्दा राहतो तो डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा. पक्ष असो अथवा नसो, प्रसंगी अपक्ष राहीन, पण लोकसभा निवडणूक लढणारच, असा निर्धार त्यांनी खूप वेळा व्यक्त केला आहे. ते लढले आणि नाही लढले तरीही संजय आणि विशाल यांना काही फायदे-तोटे संभवतात. चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे विशालसाठी ते माघार घेतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ते अपक्ष म्हणून लढले तरीही त्यांना किती मते मिळतात, हे पाहावे लागेल. त्या मतांच्या टक्क्यांवर विधानसभा निवडणुकीचा खानापूर, आटपाडी तालुक्यातील चित्राचा आदमास येऊ शकतो. 2019 च्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवाराने म्हणजेच गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखाच्या आसपास मते मिळवली होती. त्यामध्ये धनगर समाजाच्या मतांचा टक्का विलक्षण होता, असे विश्लेषक सतत सांगतात. केवळ जात हा घटक नव्हे, तर पर्याय म्हणूनही वंचितच्या उमेदवाराकडे पाहिले होते, याकडे विश्लेषक कानाडोळा का करतात? आताची परिस्थिती मात्र वेगळी आहे. 'राज्यकर्ती जमात' होण्यासाठी लढणार्या वंचित आघाडीची सांगलीतील भूमिका काय राहते ते येणार्या काही दिवसात उघड होईल. तात्पर्य काय तर चंद्रहार पाटील, वंचित आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना असे घटक असले तरी काँग्रेस आणि भाजपमध्येच निकराचा संघर्ष होईल, असे आजचे चित्र सांगते.