Latest

PM Modi Interview : ‘कर नाही त्याला डर कशाला’, ईडीच्या कारवाईवरून पीएम मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : PM Modi Interview : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोंदवलेले बहुतांश खटले अशा व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध आहेत ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. प्रामाणिक व्यक्तीला घाबरण्याचे कारण नाही, परंतु भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना त्यांच्या पापाची भीती वाटू लागली आहे, असा स्पष्ट खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सरकारने लोकांना तुरुंगात पाठवल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन केले.

पीएम मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी देशाच्या राजकारणाशी संबंधित अनेक विषयांवर भाष्य केले. 'माझ्याकडे मोठ्या योजना आहेत. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. माझे निर्णय कोणाला घाबरवण्यासाठी किंवा दडपण्यासाठी नाहीत. ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

पीएम मोदी पुढे म्हणाले, मी तिसऱ्या टर्मची तयारी सुरू केली आहे. सुरुवातीच्या 100 दिवसांची योजना तयार आहे. माझ्या भाषणांमध्ये मी 2024 नाही तर 2047 हे लक्ष्य नमूद करतो. जेव्हा देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर अमृत महोत्सव साजरा करत होता, त्याच वेळी मी हा विषय सर्वांसमोर ठेवायला सुरुवात केली. 2047 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील. साहजिकच असे टप्पे असतात, ते एक प्रकारे माणसाला नवा उत्साह आणि नवीन निर्धाराने भारावून टाकतात. प्रत्येकाने स्वतःसाठी एक ध्येय निश्चित केले पाहिजे.

'एक राष्ट्र, एक निवडणूक'चा देशाला फायदा

'एक राष्ट्र, एक निवडणूक' या विषयावर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'एक राष्ट्र, एक निवडणूक ही आमची वचनबद्धता आहे. अनेक लोकांनी समितीला त्यांच्या सूचना दिल्या आहेत. अनेक सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना आल्या आहेत. जर आम्ही हा अहवाल लागू करू शकलो तर देशाला खूप फायदा होईल.'

काँग्रेसने राम मंदिराचे व्होट बँकसाठी राजकारण केले

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राम मंदिराचा मुद्दा राजकीय शस्त्र म्हणून वापरला. जेव्हा आमचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा आमचा पक्षही जन्माला आला नव्हता. त्यावेळी हे प्रकरण न्यायालयात निकाली निघू शकले असते. समस्येवर काही उपाय करता आला असता. जेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हा फाळणीच्या वेळी ते ठोस निर्णय घेऊ शकले असते पण त्यांनी तसे केले नाही. या प्रकरणाचा त्यांनी व्होट बँकसाठी राजकीय हत्यार म्हणून वापर केला.

सनातनच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल

द्रमुक नेत्याने काही दिवसांपूर्वी केलेल्या 'सनातनविरोधी' टिप्पणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "काँग्रेसला विचारले पाहिजे की सनातनच्या विरोधात इतके विष कालवणा-या लोकांसोबत बसण्याची त्यांची मजबुरी काय आहे? काँग्रेसच्या मानसिकतेची ही कसली कुठली विकृती आहे?' असा टोला लगावला.

पंतप्रधान मोदी इलेक्टोरल बाँड्सवर काय म्हणाले?

इलेक्टोरल बाँड्सवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'विरोधी पक्ष या योजनेवर खोटे बोलत आहेत. याचा सर्वांनाच पश्चाताप होईल. निवडणुकीत काळा पैसा रोखण्यासाठी ही योजना होती आणि विरोधकांना आरोप करून पळ काढायचा आहे.'

राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले

राहुल गांधींवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'दुर्दैवाने आजकाल आपण पाहतो की एका शब्दाप्रती कोणतीही बांधिलकी आणि जबाबदारी नाही. तुम्ही एखाद्या नेत्याचे जुने व्हिडीओ फिरताना पाहिले असतील, जिथे त्यांची सर्व मते परस्परविरोधी आहेत. हे पाहिल्यावर हा नेता जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू पाहत आहे, असे त्यांना वाटते. अलीकडे मी एका राजकारण्याला "एक झटका में गरीबी हटा दूंगा" असे म्हणताना ऐकले. ज्यांना 5-6 दशके सत्तेत राहण्याची संधी मिळाली तेच जेव्हा असे बोलतात तेव्हा देशाला आश्चर्य वाटते की हा माणूस काय बोलतोय.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT