वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : गावागावांतून आलेल्या अहवालांनुसार लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देता येणार नाहीत. राजकारण डोक्यातून काढावे लागेल. या निवडणुकीत ज्याला पाडायचे त्याला पाडा, असे आवाहन करून सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करून आपली ताकद दाखवून देऊ, असा निर्णय मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी जाहीर केला.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सहा महिन्यांचा वेळ आहे. त्यावेळी ताकद दाखवून देऊ. राजकारणात परिपक्वता लागते. त्यासाठी जाती एक करता आल्या पाहिजेत. काही जाती फोडाव्या लागतात, राजकारण इतके सोपे नाही. आपण एकाही राजकीय सभेला जाणार नाही. मराठ्यांची ताकद दाखवून द्या. मी कुणाला मत द्या, ते सांगणार नाही. मी कुण्याही जातीचा, पक्षाचा, उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
आचारसंहिता संपल्यावर जूनमध्ये नारायणगडावर सभा घेऊ. नारायणगडावर साडेतीन हजार एकर जमीन उपलब्ध आहे, असे जरांगे म्हणाले.