मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादाची शक्ती आहे आणि या शक्तीने नरेंद्र मोदी हे लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024)
नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरीब समाजासाठी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड अहंकार आहे. 2014 साली देश स्वतंत्र झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात, असेही ते म्हणाले. शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या अतिविशाल सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे संबोधित करत होते ते पुढे म्हणाले की, मुंबई हे सर्वात शक्तिशाली शहर आहे. सर्व देशाचे लक्ष मुंबईवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांची भूमी आहे. इथला विचार सर्व देशात पोहोचतो. आज लोकशाही व संविधान अबाधित ठेवणे आपली जबाबदारी आहे. संविधान बदलणे सोपे नाही. पण तसा प्रयत्न केला तर देशात मोठी क्रांती होईल, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, आम्ही आघाडीच्या माध्यमातून 25 प्रकारच्या गॅरंटी देत आहोत. या आश्वासनांची पूर्ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. (Lok Sabha Election 2024)