Latest

Lok Sabha Election 2024 : ‘वंचित’चा फॉर्म्युला? शिवसेनेला अमान्य

Arun Patil

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील किती आणि कोणत्या जागा लढवायच्या याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने 23 जागांवर दावा करत आपला दबाव वाढविला आहे. वंचित आघाडीसह महाविकास आघाडीतील चारही पक्षांनी समसमान जागा लढवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावही मित्रपक्ष असणार्‍या शिवसेनेनेच असा परस्पर निकाली काढला आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीच्या जागांच्या अनुषंगाने शुक्रवारी काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत होणार आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते हे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत नेमक्या कोणत्या जागा लढवायच्या, याबाबत चर्चा करणार आहेत. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी म्हणून किती जागांवर दावा करायचा, याबाबतची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. या महत्त्वाच्या बैठकीनंतर दिल्लीतच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या सदस्यांसोबतही काँग्रेस नेते चर्चा करतील. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने 23 जागांवर दावा करत दबाव वाढवला आहे. (Lok Sabha Election 2024)

सेनेला 23 जागा नाही; काँग्रेस नेत्यांची भूमिका

शिवसेनेची ही भूमिका म्हणजे दबावाचे राजकारण असल्याचा सूर काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. शिवसेनेला 23 जागा मिळणार नाहीत. महाराष्ट्रात अन्य काही छोटे-मोठे पक्ष काँग्रेससोबत येणार आहेत. त्यामुळे त्यांनाही आम्हाला जागा द्यायच्या आहेत, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.

मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र येऊया : आंबेडकर

मुंबई : नरेंद्र मोदींची हुकूमशाही रोखण्यासाठी आपण सर्व मिळून एकत्र येऊया. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विचारविनिमय करून निर्णय घेतले जावेत, असे सांगतानाच मविआतील अंतर्गत वाद संपविण्यासाठी समान जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर विचार करावा, असे आवाहन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT