Lok Sabha Election 2024 
Latest

हिंगोली लोकसभा मतदार संघात अंदाजे 62.67 टक्के मतदान

करण शिंदे

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली लोकसभा मतदार संघात 33 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, आज मतदारसंघात 2008 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 18 व्या लोकसभा निवडणुकीत आज अंदाजे 62.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

हिंगोली लोकसभा मतदार संघातील वसमत विधानसभा मतदार संघ 60, हदगाव 66, हिंगोली 60, कळमनुरी 63, किनवट 65 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात अंदाजे 62 टक्के मतदान झाले आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 77 हजार 734 मतदार असून, त्यामध्ये 9 लाख 46 हजार 674 पुरुष, तर 8 लाख 71 हजार 35 महिला मतदार आहेत. त्याशिवाय इतर 25 मतदारांचा यात समावेश आहे.

निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण 

निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली, कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्रीमती आर. जयंथी यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडली, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाची वॉर रुममधून वेब कास्टींगद्वारे करडी नजर 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर हे दिवसभर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 1026 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर ठेवून होते. संपूर्ण लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी सतत मार्गदर्शन केले. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 7, दिव्यांग कर्मचारी संचलित 6 आणि युवा मतदान केंद्र-6 असे एकूण 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पापळकर यांनी दिली आहे. मतदार संघात आज सकाळपासूनच शहरी व ग्रामीण मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते. मतदान प्रक्रिया (मॉक पोल) सुरू असतानाच 39 मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात येताच, जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून तातडीने मतदान यंत्र बदलवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना प्रोत्साहन

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदान करा असे आवाहन केले होते. त्यासाठी स्वीपच्या माध्यमातून रॅली, पथनाट्य, आई-बाबांना पत्र, लोकशाहीचं लग्न असे विविध उपक्रम राबवून व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT