नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी (दि. 21) नऊ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. 22) भाजपने चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये तामिळनाडूतील आणि पुद्दुचेरीतील एका उमेदवाराचा समावेश आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दोन्ही यादीत भाजपने प्रामुख्याने दक्षिण भारतातील जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.
सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजेच 19 एप्रिलला मतदान होणार आहे. पुद्दुचेरी लोकसभा जागेवर भाजपने ए. नमशिवयम यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा सध्या काँग्रेसकडे आहे.
भाजपच्या तिसऱ्या यादीत तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांना कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. तर तेलंगाणाच्या राज्यपालपदाचा राजिनामा देणाऱ्या तमिलिसाई सुंदरराजन यांना चेन्नई दक्षिणमधून उमेदवारी दिली. त्यांच्याकडे पुद्दूचेरीच्या नायब राज्यपालपदाचीही जबाबदारी होती.