नगर, पुढारी वृत्तसेवा: शहरातील तसेच उपनगरातील महिलांचे दागिने बळजबरीने बळकावणार्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, तीन लाख 50 हजारांच्या किंमतीचे 70 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सफीर अख्तर हुसेन खान (वय 20, रा. मुंब्रा, टोलनाका, ठाणे), कैलास कमलबहादूर नेपाली (वय 25, रा. नेरळ ममदापूर, ता. कर्जत, रायगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
चोरीचे दागिने दोघेजण श्रीरामपूर येथे सोनाराकडे विक्रीसाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्याकडून मिळाली होती. त्यानुसार खबडी, वॉर्ड क्र.1 श्रीरामपूर येथे सापळा लावून आरोपींना पथकाने अटक केली. आरोपींविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिनकर मुंडे, पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, संदीप पवार, पोना शंकर चौधरी, संदीप चव्हाण, रवी सोनटक्के, सचिन आडवल, संदीप दरदंले, दीपक शिंदे आदींच्या पथकाने केली.