नगर/शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : पाडव्याच्या मुहूर्तावरील खरीदीने बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाल्याने बाजारपेठेला झळाली मिळाली. सोने, दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. दरम्यान, साईबाबांच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्याकरिता शिर्डीत भाविकांची गर्दी उसळल्याचे दिसून आले.
साडेतीन मुहूर्तापैंकी एक असलेल्या पाडव्याच्या दिवशी खरेदीसाठी बाजारात गर्दी लोटली. ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता व्यावसायिक, दुचाकी, चारचाकी शोरूममधून अनेक ऑफर्स दिल्याचे दिसून आले. दिवसागणिक सोने भाव खात असल्याने खरेदीसाठी सराफी बाजारात गर्दी उसळली. गुंतवणूकदारांनी लगड तर लग्नासाठीही अनेकांनी मुहूर्तावर सोने खरेदी केले.
दुचाकी घेताना नगरकरांनी ई-बाईकला पसंती दिल्याचे दिसून आले. सोने दागिनेसोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीलाही गर्दी झाल्याचे दिसून आले. मुहूर्त साधत अनेकांनी नवीन घरांचे बुकिंग केले. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नवीन घरांच्या बांधकामच्या साइटचे उद्घाटन केले. चैत्र पाडव्याच्या पहिल्या तिथीपासून सुरू होणार्या मराठी नववर्षाची सुरुवात साईदर्शनाने व्हावी, अशी साईभक्तांची इच्छा असते.
या इच्छापूर्तीसाठी गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरातील भाविक साईंच्या चरणी लीन होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डीतील साई मंदिरावर आज बुधवारी 'श्रद्धा सबुरीची' गुढी उभारण्यात आली. साईबाबांची शिर्डी गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षारंभी भाविकांनी गजबजून गेली आहे. साई मंदिराच्या कळसावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली आहे. साई संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून गुढी उभारली.
साईबाबांचे शिर्डीतील चारी धाम म्हणून प्रख्यात असलेले द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान आणि समाधी मंदिर हे आकर्षक फुलांनी सजवलेले होते. समाधी मंदिरात साईबाबांच्या मूर्तीला साजशृंगार करण्यात आला होता. साखर माळ घालण्यात आली होती. गुडीपाडव्या निमित्ताने सुशोभित वस्त्र चढविण्यात आले होते. चावडी, द्वारकामाई, आणि गुरस्थानचीही फुलांनी सजावट करण्यात आली होती.
सर्व धर्म समभावाची शिकवण देणार्या साईबाबांच्या शिर्डीत वर्षभरातील प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्याची परंपरा आहे. आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात करण्यात आले.