मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत नवीन संसद भवन उभे राहिल्यानंतर प्रभावित झालेल्या राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवीन विधान भवन उभे करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव दिला आहे. सध्याच्या विधान भवनलगतच्या वाहनतळावर ही वास्तू उभारण्याचा मानस नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.
लोकसंख्यानुसार मतदारसंघांची संख्या वाढत असते. सध्याच्या विधान भवनाच्या वास्तूत मंत्र्यांसह 288 आमदार तसेच मंत्री झालेले विधान परिषदेतील सदस्य बसतील इतकीच आसन क्षमता आहे. भविष्यातील आमदारांची संख्यावाढ विचारात घेऊन नवीन विधान भवनमध्ये आसन क्षमता वाढविली जाणार आहे.
सध्याच्या शामाकांत मुखर्जी चौकालगत 1876 मध्ये एक खलाशीगृह उभारण्यात आले होते. तत्कालीन ब्रिटिश सरकारने जून 1928 मध्ये ते ताब्यात घेऊन त्याचे विधान भवनात रूपांतर केले. 18 फेब्रुवारी 1929 रोजी तत्कालीन राज्यपाल मेजर जनरल सर फेड्रिक साईक यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले. देश स्वतंत्र झाल्यापासून ते 24 एप्रिल 1981 पर्यंत या जुन्या विधान भवनात विधान परिषदेची अधिवेशने झाली. ही वास्तू मोडकळीस आली होती. त्यामुळे विधिमंडळाने नरिमन पॉईंट येथे नवीन विधान भवन उभारले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते 19 एप्रिल 1981 रोजी या इमारतीचे उद्घाटन झाले. ही वास्तू उभी राहिल्यानंतर जुन्या विधान भवनामध्ये होणारे विधान परिषदेचे अधिवेशन 25 एप्रिल 1981 पासून नवीन विधान भवन इमारतीमध्ये सुरू झाले.
या वास्तूला आता 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही वास्तू सध्या बर्या अवस्थेत आहे. भविष्याचा विचार करून नवीन विधान भवन उभारले जाणार असले तरी जुनी वास्तू पाडली जाणार नाही, असेही एका अधिकार्याने स्पष्ट केले.