रजोनिवृत्ती म्हणजे महिलांच्या आयुष्यातील असा टप्पा जिथे शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर मोठे बदल होतात. साधारणपणे ४५ ते ५५ वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती येते आणि या काळात शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते. इस्ट्रोजेन हा हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाचा हार्मोन आहे. याची कमतरता झाल्यावर रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुलभा कुलकर्णी सांगतात की, "रजोनिवृत्तीनंतर महिलांनी आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. अगदी छोट्या-सहान लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. योग्य जीवनशैली आणि नियमित तपासण्या केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो."
इस्ट्रोजेन हार्मोन कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात.
कोलेस्टेरॉल वाढून धमन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होऊ शकते.
उच्च रक्तदाब आणि वजन वाढणे हेही सामान्य लक्षण असते.
मधुमेह किंवा थायरॉईड समस्या असलेल्या महिलांमध्ये हा धोका आणखी जास्त असतो.
रजोनिवृत्तीच्या काळात हृदयविकाराची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित होतात. ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या:
छातीत वेदना किंवा डाव्या हातात वेदना होणे
श्वास घेण्यास त्रास होणे
अचानक घाम येणे किंवा चक्कर येणे
सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या सवयी अंगीकारा:
संतुलित आहार घ्या: आहारात ताजी फळे, भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य आणि कमी तेलकट पदार्थ ठेवा. जास्त तूप, तेल आणि तळलेले पदार्थ टाळा.
दररोज व्यायाम करा: रोज किमान ३० मिनिटे चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम हृदयासाठी फायदेशीर ठरतो.
तणाव कमी करा: ध्यान, प्राणायाम किंवा आवडीच्या गोष्टी करून मन शांत ठेवा.
नियमित तपासण्या करा: रक्तदाब, कोलेस्टेरॉल, साखरेची पातळी वेळोवेळी तपासा.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा: या सवयी हृदयविकाराचा धोका दुप्पट करतात.
झोप पूर्ण घ्या: रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा आणि रोज किमान ७-८ तासांची झोप घ्या.
वजन नियंत्रणात ठेवा: वाढते वजन हृदयासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे संतुलित आहार आणि व्यायामाला प्राधान्य द्या.
रजोनिवृत्ती हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. योग्य जीवनशैली, नियमित वैद्यकीय तपासण्या आणि थोडीशी खबरदारी घेतल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.