कच्चं चिकन योग्य पद्धतीनं साठवलं तर ते सुरक्षित राहतं आणि खराब होण्याचा धोका कमी होतो. पण चुकीच्या पद्धतीनं ठेवलेलं चिकन काही तासांतच धोकादायक जंतू तयार करू शकतं. अनेकदा लोक फ्रिजमध्ये चिकन ठेवतात, पण किती दिवस ठेवावं, कोणत्या तापमानात ठेवावं, डीफ्रॉस्ट केल्यानंतर काय करावं या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. अशा चुका आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
कच्च्या चिकनमध्ये सॅल्मोनेला, कॅम्पिलोबॅक्टर सारखे बॅक्टेरिया लवकर वाढतात. म्हणूनच ते किती दिवस ठेवता येईल याबद्दल स्पष्ट माहिती असणं आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीनं साठवलेल्या चिकनमुळे फूड पॉइझनिंग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे स्वयंपाक करणार्या प्रत्येकाने या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
फ्रिजमध्ये कच्चं चिकन किती दिवस टिकतं?
सामान्य फ्रिजमध्ये (0°C ते 4°C तापमानात) कच्चं चिकन फक्त 1 ते 2 दिवस सुरक्षित राहतं. यापेक्षा जास्त दिवस ठेवल्यास ते खराब होऊ शकतं. अनेक वेळा फ्रिजमध्ये ठेवलेलं चिकन ताजं दिसतं, वासही येत नाही, पण त्यात बॅक्टेरिया वाढलेले असू शकतात. म्हणून “2 दिवस” हा सर्वात सुरक्षित कालावधी मानला जातो.
डीप फ्रीजरमध्ये किती दिवस ठेवू शकता?
डीप फ्रीजरमध्ये -18°C किंवा त्यापेक्षा कमी तापमानात कच्चं चिकन 9 ते 12 महिने सुरक्षित राहू शकतं. डीप फ्रीजमुळे बॅक्टेरियाची वाढ थांबते, त्यामुळे चिकन खराब होत नाही. मात्र, ते योग्य पॅकिंगमध्ये ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
कच्चं चिकन कसं स्टोअर करावं?
कच्चं चिकन हवाबंद (एअरटाईट) पॅक किंवा कंटेनरमध्येच साठवा. उघडं ठेवलं तर फ्रिजमधल्या इतर पदार्थांवर त्याचे ड्रिपलेट्स पडू शकतात आणि क्रॉस-कंटॅमिनेशन होण्याचा धोका वाढतो. तसेच प्लास्टिक रॅप, झिप लॉक बॅग किंवा एअरटाइट डब्यात ठेवणं सर्वात सुरक्षित मानलं जातं.
डीफ्रॉस्ट केलेलं चिकन परत फ्रीजमध्ये ठेवायचं?
खूपजण ही मोठी चूक करतात. फ्रीजरमधून काढून मऊ झालेलं (डीफ्रॉस्ट केलेलं) चिकन पुन्हा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. डीफ्रॉस्ट करताना चिकनवर जंतू वाढायला सुरुवात होते. ते पुन्हा फ्रीजमध्ये गेलं तर बॅक्टेरिया नष्ट होत नाही उलट, चिकन अधिक धोकादायक बनू शकतं. त्यामुळे डीफ्रॉस्ट केलेलं चिकन लगेच शिजवा.
खराब चिकन ओळखायचं कसं?
रंग राखाडी किंवा चिकट पोत
विचित्र किंवा आंबूस वास
पृष्ठभागावर चिकट थर
असं काही दिसलं तर ते लगेच फेकून द्या.
आरोग्याच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं?
कच्चं चिकन हाताळताना हात, चाकू, चिरण्याचा फळी हे सर्व गरम पाण्याने स्वच्छ धुवा. कच्च्या चिकनचा रस इतर पदार्थांवर पडू देऊ नका. चिकन नेहमी 75°C तापमानापर्यंत शिजवलं पाहिजे, तेव्हाच त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात.
योग्य तापमान, योग्य पॅकिंग आणि योग्य स्वच्छतेचे नियम पाळले तर चिकन सुरक्षित आणि चविष्ट राहतं. पण जर काळजी घेतली नाही, तर त्यातून होणारे आजार संपूर्ण कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे कच्चं चिकन फ्रिजमध्ये किती दिवस ठेवायचं आणि कसं ठेवायचं हे नीट पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.