पुणे : तंबाखूसेवन आणि धूम्रपान केवळ फुप्फुसे आणि हृदयावरच नाही तर महिलांच्या प्रजननक्षमतेवर देखील परिणाम करते. त्यामुळे गर्भधारणेवेळी गुंतागुंत, वंध्यत्व आणि काही विशिष्ट कर्करोगांचा धोका वाढू शकतो. महिलांनी धूम्रपानाची सवय टाळून प्रजनन आरोग्य सुधारण्याची गरज आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
महिलांमध्ये तंबाखूचा वाढता वापर हा देखील धूम्रपानाचा एक प्रकार आहे; गुटखा आणि खैनीसारखी धूररहित तंबाखूजन्य उत्पादने, विशेषतः ग्रामीण भागात याचा वापर वाढत असून हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. शहरी महिलांमध्ये हुक्का आणि ई-सिगारेटचे व्यसन वाढत आहे. कोणत्याही प्रकारचे तंबाखू सेवन हे स्त्रीच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम करू शकते आणि कर्करोगाची शक्यता वाढवते.
तंबाखूचे सेवन आणि सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. व्यसन टाळल्यास प्रजनन आरोग्यासंबंधी समस्या टाळता येतील. महिलांनी धूम्रपानाचे व्यसन सोडावे. त्यासाठी एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या, सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी व्हा, सकस आहाराच्या सवयी लावा, दररोज व्यायाम करा.डॉ. प्रशांत चंद्रा, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट
तंबाखूमधील हानिकारक रसायने प्रजनन प्रणालीला हानी पोहोचवतात. तंबाखूमध्ये असलेली निकोटीन, कार्बन मोनोऑक्साइड, टार, फॉर्मल्डिहाइड, बेंझिन, आर्सेनिक आणि शिसे ही रसायने संप्रेरकांच्या पातळीत व्यत्यय आणतात. प्रजनन अवयवांना होणारा रक्त प्रवाह कमी करतात आणि स्त्रीबीजाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. त्यामुळे वंध्यत्व, गर्भधारणेची शक्यता कमी होणे आणि बाळांमध्ये विकासात्मक समस्यांचा धोका वाढतो.
धूम्रपान करणार्या महिलांमध्ये अंडाशयाचे कार्य बिघडल्यामुळे आणि हार्मोनल असंतुलनामुळे वंध्यत्वाचा त्रास होऊ शकतो. धूम्रपानामुळे गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत होऊ शकते. जसे की, एक्टोपिक गर्भधारणा, गर्भपात आणि अकाली जन्म. तणाव, सामाजिक दबाव यासारखे विविध घटक महिलांना धूम्रपान करण्यास कारणीभूत ठरतात. काही महिला तणावाचा सामना करण्यासाठी धूम्रपानाचा वापर करतात. धूम्रपान सोडणे हेच महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.डॉ. मधुलिका सिंह, स्त्रीरोगतज्ज्ञ