नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अदानी समूहाच्या कंपन्यांमधील आपला भांडवली हिस्सा हा आपल्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेच्या (एयूएम) 1 टक्क्यापेक्षा कमी आहे, असे स्पष्टीकरण आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सोमवारी दिले.
गेल्या अनेक वर्षांत अदानी समूहाच्या कंपन्यांच्या आम्ही खरेदी केलेल्या समभागांची एकूण किंमत 30,127 कोटी रुपये आहे. 27 जानेवारी रोजीच्या किमतींचा विचार केल्यास या समभागांचे बाजारमूल्य 56,142 कोटी रुपये इतके भरते, असे एलआयसीने दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने अदानी समुहाबद्दल प्रसिद्ध केलेल्या एका टिकात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांना शेअर बाजारात फटका बसल्याने एलआयसीने स्पष्टीकरण दिले आहे.
31 डिसेंबर 2022 रोजीनुसार अदानी समुहाच्या कंपन्यांमधील एलआयसीचे एकूण इक्विटी व डेट यांतील भागभांडवल 35,917.31 कोटी रुपये इतके आहे. अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्ही खरेदी केलेल्या इक्विटीचे एकूण खरेदी मूल्य 30,127 कोटी रुपये आहे आणि 27 जानेवारी 2023 रोजी बाजार बंद झाला त्यावेळी हे बाजारमूल्य रु. 56,142 कोटी रुपये इतके होते. अदानी समुहाच्या अंतर्गत आजपर्यंतची गुंतवलेली एकूण रक्कम 36,474.78 कोटी रुपये इतकी आहे. मात्र ही गुंतवणूक ठराविक कालावधीत केली गेली आहे. एलआयसीकडे असलेल्या सर्व अदानी डेट सिक्युरिटीजचे क्रेडिट रेटिंग एए असे आहे आणि आयुर्विमा कंपन्यांना लागू असलेल्या इर्डाच्या गुंतवणूक नियमांचे पालन या रोख्यांच्या खरेदीत झालेले आहे, असे एलआयसीने पत्रकात नमूद केले आहे.
एलआयसीचे अदानी समूहातील गुंतवणूक मूल्य 72,200 कोटी रुपये आहे. समूहातील कंपन्यांचे शेअर घसरण्याचा फटका एलआयसीच्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना बसणार आहे. अगदी अलीकडेच एलआयसीने या समूहात 300 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. अदानी समूहावर आरोप झाल्यानंतर एलआयसीला 16 हजार 500 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
एलआयसीला गुंतवणूकदारांकडून जो पैसा मिळतो, त्याची गुंतवणूक एलआयसी करत असते. या गुंतवणुकीवर जो परतावा मिळतो, त्याचा लाभ गुंतवणूकदारांना दिला जातो. गुंतवणूकदारांची एलआयसीच्या विविध प्रॉडक्टमध्ये जी गुंतवणूक असते तिचा बराच भाग शेअर बाजाराशी जोडलेला असतो. त्यामुळे एलआयसी कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक करते, हे सामान्य गुंतवणूकदारांसाठी फार महत्त्वाचे असते.