श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा: काल-परवा बिबट्याने श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा-उक्कलगाव रस्त्यावरील शेतकर्यांच्या शेळीच्या नरडीचा घोट घेत फडशा पाडला, तर आज (सोमवारी) मध्यरात्री शेतकरी भाऊसाहेब खंडेराव थोरात यांची शेळी फस्त करणारा बिबट्या अखेर पिंजर्यात जेरबंद झाला. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव – खंडाळा रस्त्यालगतचे असलेल्या सामाईक क्षेत्र (गट.नं.316) बाबासाहेब थोरात यांच्या घरामागील बाजूस असलेल्या पडक्या जीर्ण-पाचोळा असलेल्या बर्याच दिवसांपासून बंद असलेल्या कोरड्या विहिरीत भक्ष्यासह बिबट्या पडल्याची माहिती कळताच बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
त्यावेळी घटनास्थळी जमलेली गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना बोलविण्यात आले. वनविभागाला कल्पना दिली असता कोपरगाव वनक्षेत्रपाल प्रतिभा पाटील श्रीरामपूरचे वनाधिकारी विकास पवार व कर्मचार्यांनी घटनास्थळी सकाळी धाव घेतली. पिंजरा आणून स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्यास जेरबंद करण्यात आले.
नेमके बिबटे आहेत, तरी किती..?
नेमकं बिबट्यांची संख्या किती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वनविभागाकडे याबाबत अधिकृत माहिती नाही. उक्कलगाव परिसरात कायमच बिबट्याचा वावर असल्याने दिवसाआड एकाहून-एक घटना घडत आहेत. श्रीरामपूर ग्रामीण भागासह उक्कलगावासह परिसरात बिबटे किती आहेत, असा प्रश्न वनविभागास विचारला जात आहे.