कडूस, पुढारी वृत्तसेवा: कडूस (ता. खेड) गावातून जाणाऱ्या पुलावर मंगळवारी (दि. १२) दुपारी २ वाजता बिबट्या दिसल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. कडूस गावात जाणाऱ्या पुलावर बिबट्या आपल्या पिलासह असल्याचे नागरिकांनी पाहिले. पुलावर बिबट्या असल्याची माहिती समजताच गावातील नागरिकांनी बिबट्या पहायला मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
बघ्याची गर्दी वाढल्यामुळे बिबट्याचे पिल्लू आणि मादी यांची चुकामूक झाल्याने बिबट्या पिलाला शोधण्यासाठी जागेवर ठाण मांडून बसून आहे. त्यातच बिबट्या आपल्या पिलाला शोधण्यासाठी सतत पुलावरून येरझारा मारत आहे. अनेकजण आपल्या गाड्या थांबवून बिबट्याचे फोटो आणि व्हिडिओ मोबाइल कॅमेरामध्ये कैद करत होते. ही माहिती समजताच वनपाल प्रदिप कासारे, वनरक्ष शिवाजी राठोड, संदिप अरुण, अतुल गारगोटे, आदी घटनास्थळी दाखल झाले.