बारामती; पुढारी वृत्तसेवा: एक लाख रुपये व्याजाने देत त्या बदल्यात १७ गुंठे क्षेत्राचे साठेखत करून देण्याचे ठरले असताना अशिक्षितपणाचा फायदा घेत खरेदीखत करून घेण्यात आले. पैसे दिल्यानंतर ही जमिन परत करण्याएवजी परस्पर दुसऱ्याला विकण्यात आल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील जराडवाडी येथे घडला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात धनंजय उत्तम बनकर (रा. माळवाडी, जराडवाडी, ता. बारामती) यांच्या विरोधात फसवणूकीसह सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. छाया बाळासो जराड या महिलेने याबाबत फिर्याद दिली. २९ जुलै २०१५ ते ३ मे २०२२ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादीच्या पतीच्या नावे जराडवाडी हद्दीत गट नं ३२३ व ३२५ मध्ये ५२ गुंठे जमिन आहे. २०१५ साली त्यांना मुलीच्या लग्नाचे देणे असल्याने पैशाची गरज होती.
गावातील काहींच्या मध्यस्थीने त्यांनी धनंजय बनकर यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. त्यासाठी वर्षाला ४० हजार रुपये व्याज देण्याचे ठरले. बनकर यांनी तारण म्हणून १७ गुंठे जागा साठेखत करून द्यावी लागेल असे सांगितले. त्यानुसार २९ जुलै २०१५ रोजी ते बारामतीत दुय्यम निबंधक कार्यालयात आले. तेथे बनकर यांनी कागद करून घेतला. एक लाख रुपयातील ८३ हजार रुपये फिर्यादीला देण्यात आले. उरलेली रक्कम दस्तासाठी खर्च झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीच्या मुलाने व मुलीने हा दस्त वाचला असता त्यात साठेखताएवजी थेट खरेदीखत करून घेतल्याचे लक्षात आले.
यासंबंधी फिर्यादीने बनकर यांना विचारणा केली असता त्यांनी तुम्हाला काही अडचण येणार नाही, विश्वास ठेवा असे सांगितले. त्यानंतर बनकर यांनी सात-बारा उताऱ्यावर स्वतःचे नाव लावून घेतले. ३० जुल २०१६ रोजी पहिल्या वर्षीचे ४० हजार रुपये व्याज त्यांना रोख स्वरुपात देण्यात आले. त्यानंतर पैशाची अडचण आल्याने पुढील व्याज देणे जमले नाही. त्यावरून बनकर यांनी शिवीगाळ करत हात पाय काढण्याची धमकी दिली. २०२२ मध्ये ते पुन्हा पैशासाठी मागे लागले.
२०१६ पासून सहा वर्षाचे पाच लाख रुपये द्यावे लागतील तरच जमिन परत करू, असे बनकर यांनी सांगितले. गावातील प्रतिष्ठितांना मध्यस्थी घालत फिर्यादीने ३ लाख ४० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. परंतु बनकर यांनी ती अमान्य केली. २८ जुलै रोजी त्यांनी हे क्षेत्र परस्पर अन्य व्यक्तिला विकल्याचे फिर्यादीला समजले. त्यांनी याबाबत माहिती घेत बनकर यांच्या विरोधात फिर्य़ाद दाखल केली.