लातूर, पुढारी वृतसेवा : फुग्यात हवा भरणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट होवून फुगेविक्रेता जागीच ठार झाला तर त्याच्याजवळ उभी असलेली 11 लहान मुले त्यात गंभीर जखमी झाली. जखमींवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी (दि.15)सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लातूर शहरातील तावरजा कॉलनी परिसरातील इस्लामपूरा येथे ही दुर्घटना घडली. रामा नामदेव इंगळे (वय 50) असे फुगे विक्रेत्याचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील वाघाळा राडी येथील रहिवाशी होता.
सायंकाळी साडे पाच वाजता उपरोक्त फुगे विक्रेता फुगे विक्रीसाठी इस्लामपुरा येथील एका गल्लीत आला होता. त्याच्याजवळील लुनावर गॅस सिलेंडर होते व फुग्यात गॅस भरून तो तेथील मुलांना फुगे विकत होता. त्याला पाहण्यसाठी तसेच फुगे विकत घेण्यासाठी अनेक लहान मुले तिथे जमली होती. दरम्यान अचानक सिलेंडरचा स्फोट झाला व त्याचा मोठ्या आवाजाने त्या परिसरातील लोक भयभीत होऊन आवाजाच्या दिशेने धावली असता त्यावेळी फुगे वाला रक्तबंबाळ अवस्थेत मरुन पडला होता तर 12 मुले जखमी झली होती. सिलेंडर चेपले होते तर लुनाचा चक्काचूर झाली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुधाकर वावकर व त्यांची टिम दाखल झाली व त्यांनी रुग्णवाहीकेला पाचारण केले व तातडीने जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. दरम्यान दोन मुले जास्त भाजली असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत ठार झालेला फुगेवाला हा गावोगावी फुगे विकत असे . तो काल त्याच्या लातुर येथील मुलीच्या घरी मुक्कामी होता. रविवारी तो फुगे विकण्यासाठी शहरात गेला होता.
झोया समीर शेख (वय १०)
पठाण हाफिज मणीयार (वय१२)
तलाह तय्यब पठाण ( वय ५ )
अरहान दस्तगिर शेख ( वय ४)
मरीअम इरफान शेख (वय ७)
असद पठाण (वय ७)
सद्दाफ झुबीन सय्यद (वय ६)
मुस्तफा पठाण (वय ६)
यासह अन्य दोन मुले आहेत.