Latest

५- जी : ५०% ग्राहकांचे ‘कॉल ड्रॉप’; नव्या तंत्रज्ञानाची डोकेदुखी

दिनेश चोरगे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :  गाजावाजा करीत देशात अवतरलेले ५-जी तंत्रज्ञान सध्यातरी मोबाईल धारकांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. देशातील १८५ जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही वस्तुस्थिती उघड झाली असून, ३- जी किंवा ४- जीच्या तुलनेत ५ जी तंत्रज्ञानाने अडचणी अधिक वाढल्या असल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे.
देशातील ३४ हजार स्मार्टफोन धारकांकडून 'लोकलसर्कल्स' समूहाने ५-जी सेवेच्या दर्जाबद्दल माहिती घेतली. यापैकी तब्बल ११ हजार ४४९ लोकांनी इंटरनेट डेटाचा वेग वाढल्याचे मान्य केले, परंतु ५० टक्के लोकांनी 'कॉल ड्रॉप'चे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले.

एकंदरीतच ५-जी तंत्रज्ञान यूजर्सच्या अपेक्षा अजून तरी पूर्ण करू शकलेले नाही. सेवेच्या दर्जाविषयी ग्रामीण भाग किंवा लहान शहरांमध्येच नाही, तर दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्येही तक्रारी आहेत. निम्म्या लोकांनी 'कॉल ड्रॉप'चे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले, तर २८ टक्के लोकांनी अपेक्षांच्या तुलनेत सेवेचा दर्जा ५० टक्केच आहे, असे मत व्यक्त केले. ५- जी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांपुढे दर्जा सुधारण्याचे आव्हान आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा ही सेवा देशात सुरू करण्यात आली होती, तिच्या दर्जात सुधारणा झाली नाही, असे ५८ टक्के लोकांनी सांगितले.

नाचता येईना…

सध्या देशातील १५० शहरांमध्ये ५-जी सेवा पुरविली जात आहे. मात्र, या सेवेसाठी 'ट्रान्सरिसीव्हर स्टेशन्स'ची कमतरता आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात ही सेवा मिळतच नाही. जेथे हे स्टेशन्स आहेत, त्या भागातच सेवा मिळते. त्यामुळे ४-जीपेक्षा वेगळा अनुभव मिळत नाही, असे फोन वापरणाऱ्यांचे म्हणणे आहे. टेलिकॉम कंपन्या मात्र सुमार दर्जाच्या सेवेचे खापर स्मार्ट फोनच्या दर्जावर फोडत आहेत. अनेक ठिकाणी जामर्स लावलेले आहेत, बेकायदा बूस्टर्स लावले आहेत, हीदेखील ५-जीची अपेक्षेनुसार सेवा न मिळण्याची कारणे आहेत, असे या कंपन्या सांगत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT