Latest

२२ वर्षांचा दुष्काळ संपवत पृथ्वीराज पाटील याने आणली ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कुस्ती पंढरीचा तब्बल 22 वर्षांचा दुष्काळ संपवत पै. पृथ्वीराज पाटील याने 'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोल्हापुरात आणली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पृथ्वीराजने आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून 'लोकराजा'ला मानाचा मुजरा केला. महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा असणार्‍या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात सन 1961 साली झाली.

1961 पासूनचे महाराष्ट्र केसरी विजेते

दिनकर दहयारी (औरंगाबाद, 1961), भगवान मोरे (धुळे, 1962), गणपत खेडकर (अमरावती, 1964 व नाशिक, 1965), दीनानाथ सिंह (मुंबई, 1966), चंबा मुतनाळ (खामगाव, 1967 व नागपूर, 1968), हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969), दादू चौगुले (पुणे, 1970 व अलिबाग, 1971), लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972 व अकोला, 1973), युवराज पाटील (ठाणे, 1974), रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975), हिरामण बनकर (अकलूज, 1976), आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978), शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979), इस्माईल शेख (खोपोली, 1980), बापू लोखंडे (नागपूर, 1981), संभाजी पाटील (बीड 1982), सरदार खुशहाल (पुणे, 1983), नामदेव मोळे (सांगली, 1984), विष्णूजी जोशीलकर (पिंपरी-चिंचवड, 1985), गुलाब बर्डे (सोलापूर, 1986), तानाजी बनकर (नागपूर, 1987), रावसाहेब मगर (सोलापूर, 1988), आप्पालाल शेख (सोलापूर, 1992), उदयराज जाधव (पुणे, 1993), संजय पाटील (अकोला, 1994-95), शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96), अशोक शिर्के (वर्धा, 1996-97), गोरखनाथ सरक (नागपूर, 1997-98), धनाजी फडतरे (पुणे, 1998-99), विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000), राहुल काळभोर (नांदेड, 2001), मुन्नालाल शेख (जालना, 2001-02), दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03), चंद्रहास निमगिरे (वाशी, 2002-03), सईद चाऊस (इंदापूर, 2004-05), अमोल बुचडे (बारामती, 2005-06), चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007 व सांगली, 2008), विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009), समाधान घोडके (रोहा, 2010), नरसिंग यादव (अकलूज, 2011, गोंदिया, 2012, भोसरी, 2013), विजय चौधरी (2014, 2015, 2016), अभिजित कटके (2017), बाला रफीक शेख (2018), हर्षल सदगीर (2020).

कोल्हापूरचे 'महाराष्ट्र केसरी'

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करून मानाची गदा पटकावणारे मल्ल असे : दिनकर दहयारी (1961), गणपत खेडकर (1964 व 1965), चंबा मुत्नाळ (1967 व 1968), दादू चौगले (1970 व 1971), लक्ष्मण वडार (1972 व 1973), युवराज पाटील (1974), संभाजी पाटील (1982), सरदार खुशहाल (1983), नामदेव मोळे (1984), विष्णू जोशीलकर (1985), आप्पालाल शेख (1992), विनोद चौगले (1999-2000).

पृथ्वीराजच्या विजयाने देवठाणेत जल्लोष

देवठाणे गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पृथ्वीराजने शाळेला असताना मोतीबाग तालमीत सराव केला. पुढे तो शिंगणापूर येथील राजर्षी शाहू कुस्ती केंद्रात दाखल झाला. त्याला वस्ताद दादू चौगले, वस्ताद जालंधर मुंडे, राम पोवार, रणजित महाडिक आदींचे मार्गदर्शन लाभले. शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 2018-19 (इचलकरंजी) 92 किलो गटात रौप्यपदक पटकावले. 2019-20 ला शालेय राष्ट्रीय स्पर्धेत 92 किलो गटात रौप्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत (2019-20) 92 किलो गटात सुवर्णपदक मिळविले. आसाम येथे झालेल्या 'खेलो इंडिया' (2019-20) 97 किलो सुवर्णपदकावर कब्जा केला. उत्तर प्रदेश येथे 2020-21 ला झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 92 किलो गटात रौप्यपदक, तर कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

हत्तीवरून मिरवणूक काढणार : चंद्रदीप नरके

महाराष्ट्र केसरी किताब पटकावणार्‍या पै. पृथ्वीराज पाटील याची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचे माजी आ. चंद्रदीप नरके यांनी सांगितले. तब्बल दोन दशकांनंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गदा पै. पृथ्वीराज याने मिळवून दिली. त्याच्या या विजयाबद्दल आम्हाला अभिमान आहे. पृथ्वीराज आमच्या भागातील पैलवान आहे. यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे त्याची कुंभी-कासारी परिसरातून हत्तीवरून जल्लोषात मिरवणूक काढणार असल्याचे नरके म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT