Latest

२०२४ पर्यंत जगदंबा तलवार परत आणणार; मुनगंटीवारांची ग्वाही

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. २०२४ पर्यंत ती परत आणली जाईल, अशी पुरी ग्वाही सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली. जगदंबा तलवार परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या  माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जगदंबा तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजेची तलवार आहे. इतिहासातही तशी नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. ही तलवार परत आणण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न सुरू होते. आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे मूळचे भारतीय असलेले ऋषी सुनाक यांनी स्वीकारलेली आहेत. त्यामुळे या प्रयत्नांना आणखी गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवराज्याभिषेकाला २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने एक आराखडा तयार केला जात आहे. त्यामुळे याच वर्षात जगदंबा तलवार भारतात परत आणली, तर आपला आनंद द्विगुणीत होईल, असे मुनगंटीवार म्हणाले.

जगदंबा तलवार ही कोल्हापुरातून जबरदस्तीने भेट म्हणून लंडनला देण्यात आलेली वस्तू आहे. ही तलवार भारतात परत आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. जगदंबा तलवार भारतात परत यावी, यासाठीची पहिली मागणी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केली होती. यानंतर सन १९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनीही यासाठी प्रयत्न केले होते. 'शोध भवानी तलवारीचा…' या शोधग्रंथासाठीही डॉ. जाधव यांचे मोलाचे पाठबळ लाभले. या पाठपुराव्याला आता यश येऊ लागले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाचे विशेष अभिनंदन.

– इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक

शिवछत्रपतींच्या वापरापैकी एक असणारी आणि कोल्हापुरातून लंडनला नेण्यात आलेली तलवार म्हणजे जगदंबा तलवार होय. ही तलवार महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण भारत देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. शिवछत्रपतींची तलवार हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा ऐतिहासिक ठेवा असून, तो मायभूमीत परत आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अखंड प्रयत्न सुरू आहेत. ही तलवार भारतात परत येत असेल, तर आनंदाची गोष्ट आहे. यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

— वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष अ. भा. मराठा महासंघ

SCROLL FOR NEXT