Latest

११ वर्षांपूर्वी त्सुनामीत वाहून गेलेल्या पत्नीला अजूनही शोधतो पती

Arun Patil

टोकिओ : असे म्हणतात की माणसाच्या जीवनात पती आणि पत्नीचे नाते दीर्घकाळ चालते. अशा परिस्थितीत कोण्या एकाला काही तरी झाले तर दुसर्‍याला अत्यंत त्रास होणे स्वाभाविक आहे. यामुळे काही लोक खचून जातात. काही लोक तर आपल्या लाईफ पार्टनरला वर्षांनुवर्षे विसरू शकत नाहीत. अशीच एक घटना जपानमधील आहे. तेथे एका व्यक्तीची पत्नी 2011 मध्ये आलेल्या त्सुनामीत वाहून गेली. मात्र, पती तिचा मृतदेह अजूनही शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

यासुओ ताकामात्सु असे पतीचे नाव असून पत्नी यूको ताकामात्सू ही 2011 मध्ये जपानच्या ओकागावा येथे आलेल्या त्सुनामीत बेपत्ता झाली होती. यासुओला अजूनही आपल्या पत्नीचा मृतदेह मिळेल, अशी आशा वाटते. यामुळेच तो प्रत्येक आठवड्याला पत्नीचा मृतदेह शोधण्यासाठी बाहेर पडतो. 11 मार्च 2011 रोजी आलेल्या त्सुनामीने जपानमध्ये प्रचंड नुकसान केले होते. सुमारे 40 मीटर इतक्या उंच सागरी लाटांनी जपानमधील सुमारे 20 हजार लोकांचा बळी घेतला होता. यामध्ये यूको ताकामात्सुचा समावेश होता.

जपानमधील या घटनेस 11 वर्षे पूर्ण झाली तरी पती यासुओ पत्नीचा मृतदेह शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी त्याने 2013 मध्ये डायव्हिंग परवाना मिळविला. त्यानंतर गेल्या 9 वर्षांपासून पत्नीचा मृतदेह शोधण्यासाठी यासुओ खोल समुद्रात जातो. हा त्याचा प्रयत्न दशकभरापासून सुरूच आहे.

SCROLL FOR NEXT