Latest

होळकर स्टेडियमची खेळपट्टी काळ्या मातीची की लाल मातीची?

Arun Patil

इंदूर, वृत्तसंस्था : दुसरा कसोटी सामना तीन दिवसांत संपल्यामुळे दोन दिवसांची अतिरिक्त सुट्टी मिळाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू आता तिसर्‍या कसोटीसाठी सराव करत आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून सुरू होत आहे. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच खेळपट्टीबाबत आधी नागपुरात आणि नंतर दिल्ली कसोटीत बराच गदारोळ झाला होता; पण आता इंदूरच्या खेळपट्टीबाबतही गदारोळ सुरू आहे. तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी खेळपट्टीचे काही फोटो समोर आले आहेत. यासोबतच काही बातम्याही आल्या, ज्यात इंदूरची खेळपट्टी लाल मातीपासून तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, फोटो समोर आल्यानंतर खेळपट्टीचा काही भाग काळ्या मातीचाही असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

लाल मातीपासून खेळपट्टी तयार केली असेल, तर त्यावर हलके गवतदेखील सोडले जाते. अशा परिस्थितीत या खेळपट्टीवर बाऊन्स आणि वेग दिसून येतो, याचा अर्थ या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. दुसरीकडे, काळ्या मातीच्या खेळपट्टीवर चेंडू थांबतो, अशा स्थितीत फिरकीपटूंना फायदा होतो. या स्थितीत इंदूर कसोटी सामन्याची प्रतीक्षा आहे, जिथे खेळपट्टीबाबत गदारोळ सुरू आहे.

लाल मातीची खेळपट्टी असेल, तर प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाला फायदा होऊ शकतो; कारण ताज्या खेळपट्टीत बाऊन्स असेल तर फलंदाजी करणे काहीसे सोपे होईल. अशा परिस्थितीत नाणेफेकही येथे खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. इंदूरमध्ये सामना सुरू होण्याच्या दोन दिवस आधी खेळपट्टीवर रोलर चालवून पाणी सोडण्यात आले आहे. हे अनेकदा कसोटी सामन्यापूर्वी केले जाते, येथे घरच्या संघाला किती पाणी आणि रोलर वापरायचे आहे, याचा काही फायदा होतो. 1 मार्चला इंदूरमध्ये दोन्ही संघ आमने-सामने असतील. पहिले दोन कसोटी सामने तीन दिवसांत संपुष्टात आले. तेथील खेळपट्ट्यांना आयसीसीने सरासरी असा शेरा दिला. त्यामुळे तिसरी कसोटी तीन दिवसांत संपू नये, यासाठी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा प्रयत्न असणार आहे.

SCROLL FOR NEXT