Latest

बेळगाव : हिजाब, शेल्यांवरून नंदगड कॉलेजमध्ये गोंधळ

स्वालिया न. शिकलगार

खानापूर, नंदगड : पुढारी वृत्तसेवा

महाविद्यालयातील काही विद्यार्थिनी हिजाब घालून आल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून काही विद्यार्थ्यांनी खांद्यावर भगवे शेले घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने नंदगड (ता. खानापूर) येथील महात्मा गांधी महाविद्यालयात काही काळ गोंधळ निर्माण झाला. धार्मिक वस्त्रांना महाविद्यालयात अनुमती नसल्याचे सांगून विद्यार्थी व दोन्ही गटाच्या नागरिकांची समजूत काढल्यानंतर या वादावर पडदा पडला.

महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ठगणवेश नाही. त्यामुळे शुक्रवारी काही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे हिजाब परिधान करून महाविद्यालयात आल्या. या प्रकाराला प्रत्युत्तर म्हणून काही विद्यार्थ्यांनी बॅगेतून सोबत आणलेले भगवे शेले खांद्यावर टाकून वर्गात शिरण्याचा प्रयत्न केला.

प्राचार्यांना ही बाब कळताच त्यांनी दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे बाजूला नेले. हिजाबवरील निकाल न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही धर्माच्या निदर्शक पोशाखाला शैक्षणिक संस्थांमध्ये परवानगी नसल्याचे सांगितले.
विद्यार्थिनींनी पालकांना ही बाब सांगितली. त्यांच्या पालकांनी महाविद्यालयाकडे धाव घेतली. इतक्यात नंदगड पोलिसदेखील महाविद्यालयात दाखल झाले. दोन्ही गटांच्या नागरिकांना सध्य परिस्थितीत समजुतदारपणा दाखवण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना धर्माशी निगडित पोशाख परिधान करून महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शांती आणि सलोख्यासाठी ओळखल्या जाणार्‍या नंदगड गावचे वातावरण गढूळ होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कायद्याचे पालन करण्याची सूचना

महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सर्वधर्मीय विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन करावे, यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे, अशी सूचना करण्यात आली.
नंदगड : महाविद्यालयासमोर जमलेल्या नागरिकांना शांततेचे आवाहन करताना पोलिस.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT