Latest

हिंगणघाट जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे दोषी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

हिंगणघाट जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवण्यात आले आहे. २ वर्षांनंतर पीडितेला न्याय मिळाला असून विकेश नगराळेला काय शिक्षा मिळणार हे उद्या ठरणार आहे, अशी माहिती ॲड. उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

हिंगणघाट येथे (२२ वर्षीय) शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून विकेश नगराळे याने तिला पेटवून दिले होते. या घटनेत ती शिक्षिका गंभीररित्या भाजली होती. ७ दिवसांच्या उपचारानंतरही ती वाचली नव्हती. या घटनेनंतर हिंगणघाट तसेच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.

कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या पीडित तरुणीला भरचौकात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले. शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकेश उर्फ विक्की नगराळे या नराधमाने ही घृणास्पद कृत्य केले होते.

त्या दिवशी काय घडले होते?

दैनंदिन कामकाजाकरीता पीडित महिला सोमवारी ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी घराबाहेर पडली होती. या तरुणीच्या मागावर असलेला एक तिशीतला युवक तिच्या घराबाहेरच दबा धरून बसला होता. ही तरुणी नंदेरी चौकात आली असता या युवकाने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळले. ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात घडली होती. यामध्ये पीडिता ४० टक्के भाजली होती. तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

या घटनेविरोधात अनेक मोर्चे निघाले. राजकीय नेत्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हिंगणघाट तसेच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरमध्येही नागरिकांनी बंद पुकारत या घटनेचा निषेध करण्यात आला होता.

SCROLL FOR NEXT