Latest

हार्टअ‍ॅटॅकनंतर हृदयाची डागडुजी करणारे जेल

Shambhuraj Pachindre

लंडन : हार्टअ‍ॅटॅक आल्यानंतर हृदयाच्या स्नायूंची हानी होत असते. अशावेळी हृदयाची डागडुजी करण्यासाठी बि—टिश वैज्ञानिकांनी एक विशिष्ट प्रकारचे बायोडिग्रेडेबल जेल तयार केले आहे. त्याच्या मदतीने रुग्णांच्या हृदयाच्या स्नायूंना पुन्हा मजबूत केले जाऊ शकते. त्यामुळे भविष्यात हार्टफेल होण्याचा धोका कमी असतो. मँचेस्टर युनिव्हर्सिटी आणि बि—टिश हार्ट फाऊंडेशनने एकत्रितपणे याबाबत काम केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात दरवर्षी 1 कोटी 79 लाख लोक हृदयविकारामुळे आपले प्राण गमावतात. जगातील 32 टक्के मृत्यू यामुळे होत असतात. अशावेळी हे जेल अनेक रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते. हे जेल 'पेप्टाइडस्' नावाच्या अमिनो अ‍ॅसिडपासून बनवलेले आहे. त्याला प्रोटिनचे 'बिल्डिंग ब्लॉक' मानले जाते. संशोधकांनी या जेलमध्ये मानवी पेशी मिसळून अशाप्रकारे प्रोग्रॅम केल्या की त्या हृदयाच्या स्नायूंमध्ये रूपांतरीत होतात.

या जेलला द्रवरूपातच रुग्णाच्या हृदयात इंजेक्ट केले जाऊ शकते. या जेलच्या माध्यमातून नव्या पेशी हृदयात जातात आणि घनस्वरूपात येऊन तिथेच थांबतात. याबाबत उंदरांवर काही प्रयोग करण्यात आले. उंदराच्या हृदयात इंजेक्ट केल्यावर हे जेल दोन आठवडे तिथे टिकून राहिले. प्रमुख संशोधिका कॅथरिन किंग यांनी सांगितले की हे जेल सध्या चाचण्यांच्या टप्प्यात आहे. मात्र, त्यामध्ये निकामी होत चाललेल्या हृदयाला तसेच हार्टअ‍ॅटॅकनंतर क्षतिग्रस्त झालेल्या हृदयालाही दुरुस्त करण्याची क्षमता आहे. आता लवकरच उंदरांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकनंतर तत्काळ हे जेल इंजेक्ट केले जाणार आहे.

SCROLL FOR NEXT