Latest

हातकणंगलेची मतदारसंघ रचना ‘ईडी’च्या दारात..!

Arun Patil

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ प्रारूप रचनेला वेगळे वळण लागले आहे. अर्थपूर्ण व्यवहारांतून गावांची तोडफोड केल्याचा आरोप करीत थेट 'ईडी'कडे तक्रार करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारीचा मसुदा तयार होत असून, शुक्रवारी शिष्टमंडळ 'ईडी'च्या मुंबई कार्यालयात तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील काही अधिकार्‍यांवर गंभीर आरोप असून, त्यांच्या मालमत्तांसह अलीकडच्या काळातील त्यांच्या उलाढालीच्या सखोल चौकशीची प्रमुख मागणी तक्रारीत असल्याचे समजते.

हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ रचनेत भौगोलिक सलगता, दळणवळणाचा विचार केला नाही. एका बड्या नेत्याच्या इशार्‍यावरून अधिकार्‍यांनी गावांची तोडफोड केली. या रचनेदरम्यान काही बड्या अधिकार्‍यांनी इच्छुकांकडून चांगलेच हात धुऊन घेतल्याची उघड चर्चा आहे.

आ. आवाडेंच्या भूमिकेला बळ

यासंदर्भात पहिल्यांदा आमदार प्रकाश आवाडे यांनी रोखठोख भूमिका मांडली होती. प्रारूप जाहीर होण्यापूर्वी नकाशा, गावांची रचना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची तक्रार त्यांनी केली होती. आता प्रारूप जाहीर झाल्यानंतर हरकतींचा पाऊस सुरू असून, आतापर्यंत तब्बल 26 हरकती दाखल झाल्याने आमदार आवाडेंच्या भूमिकेला पाठबळ मिळत आहे.

गावसभांमध्ये ठराव

वैयक्तिक हरकतींसोबत या लढ्याला व्यापक स्वरूप येत आहे. नुकत्याच झालेल्या विशेष गावसभेत बहुतांशी गावांनी ही रचना फेटाळून लावली असून, चूक दुरुस्त करण्याचे ठराव केले आहेत. या ठरावांच्या प्रती जिल्हाधिकारी, निवडणूक आयोगाकडे पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

SCROLL FOR NEXT