Latest

हा अझीझ अली नक्‍की होता तरी कोण? हा खरा की खोटा?

Arun Patil

बायोपिकचा मुखवटा धारण करून आलेला हा अझीझ अली नक्‍की होता तरी कोण? हा खरा की खोटा? फक्‍त बॉक्सिंगमध्ये नव्हे तर एकंदर क्रीडा क्षेत्रात कित्येक अझीझ अली असेच दबले जात असतील का?

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित 'तुफान' नुकताच अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलिज झाला. बॉक्सिंगच्या खेळात आपलं नाव जगभर पोहोचवणार्‍या 1960 सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या मोहम्मद अली या सार्वकालिक महान बॉक्सरला आदरांजली वाहण्याचा हा एक प्रयत्न आहे. 'तुफान' हा बॉक्सिंगवर आधारित काही पहिलाच चित्रपट नाही.

याआधीही 'रेजिंग बुल', 'साऊथपॉ', 'नेव्हर बॅक डाऊन'सारख्या विदेशी चित्रपटांमधून आणि 'मेरी कोम', 'सुलतान', 'साला खडूस', 'मुक्‍काबाज' अशा हिंदी चित्रपटांमधूनही बॉक्सिंगच्या खेळाचा थरार प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर अनुभवता आला होता.

अशा चित्रपटांचा शेवट काय असणार, हे सर्वांनाच ठाऊक असल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरार निर्माण करण्याचे आव्हान दिग्दर्शकापुढे असते. त्यासाठी आधार घेतला जातो मनोरंजक मूल्यांची योग्य सांगड घालत कथेच्या शेवटाकडे नेणार्‍या उपकथानकांचा आणि नेमका इथेच 'तुफान' कमी पडतो..

या चित्रपटात अझीझ अली ऊर्फ 'तुफान'ची मध्यवर्ती भूमिका साकारणारा फरहान अख्तर हा कमालीचा गुणी अभिनेता. राकेश ओमप्रकाश मेहरांच्याच 'भाग मिल्खा भाग'मध्ये प्रचंड घाम गाळताना तो दिसला होता. यातलं अझीझ अली हे पात्र सध्याचा मोहम्मद अली असावा अशारीतीने सादर केलं गेलं आहे. परेश रावलच्या वाट्याला आलेल्या काही संवादांमधून ते वारंवार प्रेक्षकांवर ठसवलंही जातं.

पण मोहम्मद अलीच्या वजनाखाली फरहान पुरता दबला गेला आणि प्रेक्षकांच्या पदरी निराशाच आली. मग बायोपिकचा मुखवटा धारण करून आलेला हा अझीझ अली नक्‍की होता तरी कोण? हा खरा की खोटा? फक्‍त बॉक्सिंगमध्ये नव्हे तर एकंदर क्रीडा क्षेत्रात कित्येक अझीझ अली असेच दबले जात असतील का? अशा प्रश्‍नांचं डोक्यात वादळ सुरू होतं.

क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, जलतरण, कबड्डी, बॉक्सिंग, कुस्ती, धावण्याच्या शर्यती, नेमबाजी, बैलगाडी शर्यती, जलीकट्टू, स्केटिंग, बॅडमिंटन, बाईक रेसिंग अशा कित्येक खेळांवर आशयघन चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीने बनवले आहेत.

त्यातील काही चित्रपट प्रसिद्ध खेळाडूंच्या जीवनावर आधारित आहेत. या चित्रपटांमधील प्रमुख व्यक्‍तिरेखा आणि त्या व्यक्‍तिरेखेचा तिच्या ध्येयापर्यंतचा एकंदरीत 'सिनेमॅटिक' प्रवास पाहता हे खेळाडू कुठल्या परिस्थितीतून इथपर्यंत येतात? झटक्यात मिळालेल्या प्रसिद्धीला कसे सामोरे जातात? त्यांच्या लेखी यशाची व्याख्या नेमकी काय असते?

त्यांना मिळालेला पाठिंबा त्यांच्या यशापयशात कोणती भूमिका पार पाडतो? त्यांच्या यशापयशाचा, वैयक्‍तिक आयुष्यातील घडणार्‍या गोष्टींचा तत्कालीन समाजमनावरील प्रभाव नेमका कसा असतो? चित्रपटात दाखवतात तसं हे चित्र खरंच एका रात्रीत पालटतं का? अशा प्रश्‍नांच्या फैरी मनात झडू लागतात आणि भारतातील क्रीडा क्षेत्राचा आरसा समजले जाणारे एकेक बायोपिक डोळ्यांसमोर झरझर तरळू लागतात.

गेल्या दशकात आलेल्या मिल्खा सिंग, मेरी कोम, बुधिया सिंग, गीता-बबिता फोगाट, पानसिंग तोमर, महेंद्रसिंग धोनी, सायना नेहवाल, मोहम्मद अझरुद्दीन अशा खेळाडूंवरच्या बायोपिक्सने भरपूर प्रसिद्धी मिळवली.

या सर्व बायोपिक्सचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली अवास्तव आणि नाट्यमय घटनांना मूळ कथेपेक्षा अकारण अधिक महत्त्व देऊन दाखवलेला मध्यवर्ती पात्राचा संघर्षमय प्रवास!

मग ते प्रेक्षकांना भावनिकद‍ृष्ट्या चित्रपटाशी जोडून ठेवणारी 'भाग मिल्खा भाग'मधली मिल्खासिंगच्या अपयशासाठी कारणीभूत ठरलेली हाक असो अथवा 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी'मध्ये धोनीच्या पूर्वप्रेयसीने त्याची पहिली मॅच पाहणे असो… असे कित्येक प्रसंग चित्रपटातील मनोरंजन वाढवण्यास कारणीभूत ठरत असले तरी प्रत्यक्षात अशा घटना घडल्याच नसल्याचे लक्षात आल्यावर भ्रमनिरास होतो.

एखाद्या 'बायोपिक'मध्ये कितीही वास्तविकता आणली तरी त्याच्यावर बॉलीवूड मसालेपटांचा शिक्‍का मारल्याशिवाय तो रीलिजच होऊ शकत नाही, हे कटू सत्य 2014 ला आलेल्या ओमंग कुमार दिग्दर्शित 'मेरी कोम' या चित्रपटातून अधोरेखित झालं. महिला बॉक्सर मेरी कोमच्या जीवनाचा आरसा असलेला आणि चवीपुरता मेलोड्रामा भरलेला हा चित्रपटही बॉक्सिंगवरच आधारित होता, हे विशेष!

मैदानातील खेळाडू पडद्यावर नायक/ नायिकेचं रूप धारण करत असल्याने त्याला टिपिकल मसाला चित्रपटछाप नृत्य वा गायन करणं अपरिहार्य ठरतं आणि इथूनच अपेक्षित वास्तविकतेला छेद देत चित्रपट त्या खेळाडूच्या नायकत्वाकडे प्रवास करू लागतो.

मग त्या खेळाडूने निव्वळ आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर मिळवलेलं यश दुय्यम ठरवलं जातं आणि चित्रपटाची रंजकता वाढवण्यासाठी जन्माला घातलेल्या उपकथानकांना त्या यशाची प्रमुख कारणं म्हणून रंगवलं जातं.

मग कधी हा नायक समाजव्यवस्थेत भरडला गेलेला, शोषणाचा बळी ठरलेला असतो तर कधी तो प्रेयसीने, मित्राने किंवा नातेवाईकाने केलेल्या अपमानाने डिवचला गेलेला असतो.

कधी काळी आपला खेळ गाजवूनही इतर कारणांमुळे बहिष्कृत केला गेलेला खेळाडू प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करून नव्या दमाच्या खेळाडूंना हरवताना दिसतो तर कधी अगदीच साधारण कौशल्यांचा वापर करून तो नव्या तंत्रज्ञानावर मात करताना दिसतो.

बर्‍याचदा काही अतिशयोक्‍तीपूर्ण उपकथानके जोडून त्या खेळाडूने केलेल्या चुकांवर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला जातो. या सर्वच गोष्टी 'बायोपिक' या शब्दाचं वजनच काढून घेतात.

'एम. एस. धोनी'चा निर्माता असलेल्या अरुण पांडेंच्या मते, अशा चुका म्हणजे फक्‍त जाणूनबुजून पसरवलेल्या अफवा असतात, ज्यांचं उगाच अवडंबर केलं जातं. त्यामुळे या चुकांना चित्रपटात दाखवून त्या खेळाडूच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं योग्य दिसत नाही.

पांडेंचं हे मत चित्रपटाच्या व्यावसायिक यशासाठी जरी महत्त्वपूर्ण ठरत असलं तरी ते त्या चित्रपटाला 'बायोपिक' म्हणून सादर करण्यासाठी मारक ठरतं. असे चित्रपट एक जीवनपट म्हणून ओळखले जाण्यापेक्षा प्रतिमासंवर्धनाचं एक माध्यम म्हणून ओळखले जातात.

त्यातील उपकथानकेही निव्वळ खोट्या कुबड्या वाटू लागतात. याउलट विविध खेळांना कथेचा केंद्रबिंदू ठेवून त्यावर आधारित असलेल्या पण 'बायोपिक' नसलेल्या चित्रपटांमध्ये मात्र अशी दमदार उपकथानके पाहायला मिळतात.

उदाहरणार्थ, 'मुक्‍काबाज'मधला जातीयवाद हा 'तुफान'मधल्या लव्ह जिहादपेक्षा जास्त भिडतो तर 'साला खडूस'मधलं गुरू-शिष्यांचं लव्ह-हेट रिलेशनशिप हे 'तुफान'मधल्या पक्षपातासमोर कधीही उजवं ठरतं.

क्रीडा क्षेत्रातील खाचखळग्यांचं वास्तवदर्शी चित्रीकरण अशा चित्रपटांमध्ये अधिक दाहकपणे प्रेक्षकांसमोर मांडलं जातं, हे स्वतःला 'बायोपिक' म्हणवून घेणार्‍या चित्रपटांचं सर्वात मोठं अपयश आहे.

प्रथमेश हळंदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT