Latest

हसन मुश्रीफ : भाजपने एसटीचे विलीनीकरण सत्तेत असताना का केले नाही?

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळ 12 हजार कोटी रुपये तोट्यात आहे. राज्य सरकारने पगार व इतर गोष्टी दिल्या आहेत. परंतु; एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीकरणासाठी भाजप नेते आंदोलनकर्त्या कामगारांना भडकावत आहेत. एवढा पुळका होता तर मग भाजपने सत्तेत असताना एसटीचे विलीनीकरण का केले नाही? अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियानप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, यंदा पक्ष नोंदणीबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपापलिका निवडणुकांसाठी तालुकावार मेळावे घेतले जाणार आहेत. 28 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षांत विकास निधीसाठी अन्याय झालेल्या तालुक्यांचा बॅकलॉग भरून काढला जाईल. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून जिल्हा राज्यात एक नंबरवर आणण्यासाठी सज्ज व्हावे.

आ. राजेश पाटील म्हणाले, आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर निवडणुका स्वतंत्रपणे लढवून पक्षाची ताकद दाखवून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा. भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा डाव कार्यकर्त्यांनी हाणून पाडावा. माजी आ. के. पी. पाटील म्हणाले, देशावर भाजपचे मोठे संकट असून, ते देश विकायला निघाले आहेत. यासाठी पुरोगामी विचारांची ताकद वाढविली पाहिजे.

कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी सभासद नोंदणीची माहिती दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील, माजी महापौर आर. के. पवार, महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मानसिंग गायकवाड, व्ही. बी. पाटील, भैयासाहेब माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आदिल फरास, अनिल घाटगे, रोहित पाटील, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर आदी उपस्थित होते.

कंगनाच्या वक्तव्याचा निषेध

अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. 17 नोव्हेंबर रोजी होणार्‍या ग्रामसभेत कंगनाचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याचा ठराव करून तो राज्य व केंद्र सरकारला पाठविण्याबाबतचा व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अभिनंदनाचा ठराव राजेश लाटकर यांनी मांडला. त्यास नेते व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात संमती दिली.

महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम

दीड वर्षात राज्यात चार चक्रीवादळे आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला 10 हजार कोटी रुपये दिले. मात्र, महाराष्ट्राला दहा पैसेही दिले नाहीत. केंद्र सरकारने जीएसटीचे 50 हजार कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. केंद्र सरकार राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम करीत असल्याची टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT