Latest

हरियाणा येथील राखीगढीत 1 नव्हे, 40 सांगाडे

Arun Patil

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : हरियाणा येथील राखीगढीत भारतीय पुरातत्त्व विभागाने नुकत्याच केलेल्या उत्खननात मिळालेल्या सांगाड्यातील डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आला असला तरी पुण्याच्या डेक्‍कन कॉलेजने त्याच राखीगढीत 2011 ते 2017 या काळात केलेल्या उत्खननात तब्बल 40 मानवी सांगाडे मिळाले होते. एवढेच नव्हे तर त्यापैकी एकाच्या डीएनए तपासणीत ती व्यक्‍ती भारतीयच असल्याचा व सिंधू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन असल्याचा निष्कर्ष जाहीर करण्यात आला होता.

डेक्‍कन कॉलेजचे तत्कालीन कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी 'पुढारी'शी बोलताना माहिती दिली. देशाच्या नागरी संस्कृतीचा उगम हडप्पा-मोहेंजोदडोमधून झाला, असे मानले जात होते. पण या दाव्याला डेक्‍कन कॉलेजने काही वर्षांपूर्वी केलेल्या उत्खननाने धक्‍का बसला. सिंधू संस्कृतीचे मूळ पाकिस्तानातील हडप्पा-मोहेंजोदडो नसून हरियाणातील राखीगढीत दडलेले आहे.

त्या संशोधनात या संस्कृतीचा विकास कसा झाला, यावर लक्ष देण्यात आले. हडप्पा संस्कृतीची सर्वात मोठी वसाहत कोणती हे तपासण्यात आले. ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारचा (जीपीआर) वापर करून वसाहतीच्या प्राचीनतेचा अभ्यास झाला. तसेच दफनभूमीचाही अभ्यास झाला.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एका सांगड्यात मिळालेल्या डीएनएची हैदराबादच्या प्रयोगशाळेत तपासणी केली असता ती व्यक्‍ती भारतीय होती, तिचा कालखंड इसवी सनपूर्व किमान सात हजार वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. तसेच या पथकाने हिस्सारमधीलच 'फरमाना' या गावात केलेल्या उत्खननात आढळलेल्या 70 मानवी सांगाड्यांत एकही डीएनए मिळाला नव्हता, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT